आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवली; बाजारपेठ थंडावली, 300कोटींची उलाढाल ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना म्हणजे व्यापारी वर्गासाठी पर्वणी मानली जाते. या महिन्यात मोठी उलाढाल होत असते. मात्र, एक जुलैपासून लागू होणारा जीएसटी कायदा आणि एटीएममधील खडखडाटामुळे बाजारपेठ थंडावली आहे. नेमकी किती कोटींची उलाढाल ठप्प झाली, याचा अचूक आकडा सांगितला जात नाही. मात्र, व्यापारी, उद्योजकांच्या मते किमान ३०० कोटींचा व्यवहार थांबला आहे. 
 
1 जुलैपासून वस्तू सेवाकर (जीएसटी) लागू होत आहे. याविषयी व्यापारीवर्गात मोठा संभ्रम आहे. मालाचा स्टॉक करावा की नाही? जुना माल पंधरा दिवसांत विक्रीसाठी काढावा लागेल का? नवा माल स्वस्त राहील की नाही, असे अनेक प्रश्न पडल्याने बाजारातील तब्बल ६० टक्के व्यवहार थांबले आहेत. एक जुलैनंतर अनेक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली सांगत असल्याने सध्या ग्राहक खरेदीसाठी फारसे उत्सुक नाहीत. एफएमसीजी अर्थात रोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचीच खरेदी-विक्री सुरू आहे. मोबाइल, प्लास्टिकच्या वस्तू, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदींच्या बाजारात शंभर कोटी, तर उद्योग क्षेत्रात सुमारे २०० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
कर भरण्याची धास्ती : केंद्रसरकारने जीएसटी कायद्याची अंमलबजावणी जुलैपासून करण्याची घोषणा केली. या कायद्याबाबत आणि विविध वस्तूंवर लागणाऱ्या कराविषयी सरकारी, निमसरकारी पातळीवर अनेक प्रबोधन वर्गही झाले. पण हा कायदा लागू होताच बाजारात साठ्याची मोठी टंचाई निर्माण होऊन मंदीची लाट येईल की काय, अशी भीती व्यापाऱ्यांसह उद्योजकांनाही वाटत आहे. नेमका जीएसटी कसा राहील. कोणत्या वस्तूंचा साठा केला तर किती जीएसटी लागेल, याचा परिपूर्ण अभ्यास सध्या शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एकदा खरेदी केलेल्या मालाचे पुढे काहीही झाले तरी त्यावरचा कर भरणा करावाच लागणार आहे. या धास्तीने व्यापाऱ्यांकडून नवी खरेदी किंवा माल मागवणे ठप्प आहे. 
 
कपडा बाजार वगळता इतरत्र शांतता 
शहरातील किरकोळ ठोक बाजारपेठेत ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने फेरफटका मारला असता अशी दिसली मंदी... 
 
५०% मोबाइल
४०% कपडा
६०% इलेक्ट्रॉनिक
७०% सोने-चांदी
 
रमजाननिमित्त अनेक ऑफर्स असल्या तरी त्यांना प्रतिसाद नाही. एटीएम कोरडेठाक असल्याने हैराण झालेला ग्राहक हादेखील बाजारपेठेतील मंदीचे एक कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
उद्योग क्षेत्रालाही फटका 
उद्योगक्षेत्रात छोटी कामे करून पैसे मिळवणारे व्यावसायिक अडचणीत आहेत. विद्युतीकरण, बांधकाम साहित्याच्या व्यापाऱ्यांनी माल आणणे थांबवले आहे. उद्योजकांनी सुटे भाग, कच्चा माल सध्या खरेदी करायचा नाही, असे धोरण ठेवल्याने या क्षेत्रातील सुमारे २०० कोटींचे व्यवहार ठप्प आहेत.
 
विचित्र परिस्थिती 
बाजारात मंदीसह संभ्रमाचे वातावरण आहे हे खरे आहे. कारण जीएसटी लागू झाल्यावर बाजार नेमका कसा असेल. किमतीवर काय परिणाम होतील, याची चिंता व्यापारी वर्गाला आहे. अशीच उद्योग क्षेत्रातही स्थिती आहे. -अल्केशराव का, अध्यक्ष, सीए संघटना 
 
व्यापारी हैराण 
नोटाबंदीपासून शहराची बाजारपेठ हैराण आहे. हळूहळू परिस्थिती पूर्ववत होईल, असे वाटत होते. पण दिवसेंदिवस व्यवहार बिकट होत आहेत. एटीएम बंद असल्यानेही रोखीने खरेदी- विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना मालाच्या किमतीची चिंता लागली आहे. -अजय शहा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ 
 
बातम्या आणखी आहेत...