आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत जीटीएलने दिले दहा हजारांपेक्षा जास्त बिल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडको पवननगरातील तीन ग्राहकांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे जास्तीचे बिल देण्यात आले आहे. बिल भरा अन्यथा पुरवठा खंडित करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसाही जीटीएलकडून पाठवल्या आहेत. या परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरमधील लोकांनी घराचे बांधकाम केले आहे. मात्र, बांधकामासाठी फारसी वीज वापरली नसतानाही त्यांना 25 हजारांपर्यंत बिल देण्यात आले आहे. कार्यालयात चौकशीसाठी गेलेल्या ग्राहकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत.

महिन्याचे बिल 8160
ज्ञानेश्वरनगर येथील शांताराम देसले यांना दरमहा 250 रुपये बिल येते. त्यांनी नुकत्याच दोन खोल्यांचे बांधकाम केले. त्यासाठी कोणतीही वीज वापरली नाही. बांधकामासाठीचे कंत्राट दिले होते. त्यामुळे विजेचा वापर झाला नाही, असे असतानाही त्यांना जीटीएलने त्यांना 8160 रुपयांचे बिल देण्यात आले. त्याबाबत कार्यालयात विचारणा केली असता तुम्ही व्यावसायिकरीत्या बांधकाम केल्यामुळे बिल लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बिलांची सुनावणी व्हावी
याच नगरातील उदयकुमार खोचे यांनादेखील 24590 रुपयांचे बिल आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी बांधकाम सुरू केले आहे. त्यासाठी त्यांना नेहमीच्या वीज बिलापेक्षा तीन ते हजार ते चार हजार वीज बिल जास्त येत होते. चार महिन्यांपासून बिल भरल्यानंतरही त्यांना पुन्हा 24590 रुपयांचे बिल आले आहे. त्यांनी जीटीएलकडे तक्रारदेखील केली आहे. हे वीज बिल मान्य नसून कलम 127 अंतर्गत सुनावणी करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत जीटीएलकडून त्यांना वीज बिल विद्युत कायद्यानुसार आपल्या मीटरची तपासणी केली असता अनियमितता आढळून आली असून वीज बिल विद्युत कायदा 2003 चे कलम 126 प्रमाणे देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हे वीज बिल पंधरा दिवसांत नाही भरल्यास विद्युत पुरवठा रद्द करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

न्यायालयात जाणार
नवीन बांधकाम तसेच दोन खोल्या बांधल्या तरी जीटीएलकडून अवाजवी बिल लावण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जीटीएलच्या अधिकार्‍यांना याबाबत निवेदन दिले आहे. मात्र, जीटीएलकडून अजून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. याबाबत न्यायालयात जाणार आहोत.
-ऊर्मिला चित्ते, नगरसेविका.

या तीनही ग्राहकाचे ग्राहक क्रमांक आम्ही तपासले आहेत. याबाबत तीनही जणांच्या मीटरची पुनर्तपासणी करण्यात येईल. जोपर्यंत मीटर चेक केले जाणार नाहीत, तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही. त्यामुळे याबाबत हे मीटर चेक करूण त्याबाबत तोडगा काढण्यात येईल.
-समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी, जीटीएल.

दुरुस्ती पडली महागात
राहुल पाथ्रीकर यांनी त्यांच्या दोन खोल्यांची दुरुस्ती केली म्हणून त्यांनाही 10590 रुपयांचे बिल देण्यात आले आहे. पाथ्रीकर यांनी तक्रार केल्यानंतर चुकून बिल आल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर पुन्हा 10590 रुपयांची नोटीस त्यांना देण्यात आली आहे. पंधरा दिवसांत पैसे नाही भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल, अशी नोटीस त्यांना देण्यात आली आहे. जीटीएलच्या अधिकार्‍यांमध्येच समन्वय नसल्याच यावरून स्पष्ट होते.