आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्मथनगरातील नागरिकांचा जीटीएलला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सर्मथनगरातील नागरिक नियमित वीज बिल भरतात. या भागात चोरी व वीज गळतीचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी असेल, तेव्हा थकबाकी किंवा गळतीच्या नावाखाली भारनियमन करण्यापूर्वी जीटीएलने विचार करावा; अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नागरिकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.
ज्या भागात वीज गळती आणि थकबाकीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी पाच तास भारनियमन करण्याची परवानगी जीटीएलने महावितरणकडे मागितली आहे. ती मंगळवारपर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे. भारनियमनामध्ये सर्मथनगरचादेखील समावेश आहे. येथील नियमित वीज बिलाचा भरणा करणार्‍या नागरिकांच्या भारनियमनाविषयी ‘दिव्य मराठी’ने प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता जीटीएलने स्वत:ची कार्यक्षमता तपासण्याची गरज असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. या भागात भारनियमनापूर्वी आठ-आठ तास वीज बंद ठेवून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. काही कुटुंबांतील रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. पुरवठा बंद झाला की रुग्णांना श्वास घेण कठीण होते. मग त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवावे लागते.
काय म्हणतात नागरिक

जीटीएलचे धोरण चुकीचे
जीटीएल व्यवस्थापन थकबाकीची वसुली सक्तीने का करत नाही? हे सोडून भारनियमन सुरू करण्याचा निर्णय घेत आहे. यामुळे गृहिणींना जास्त मनस्ताप होईल. कल्याणी गोसावी, रहिवासी
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव
जीटीएल व्यवस्थापनाकडे अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव दिसून येतो. कुशल मनुष्यबळही नाही. त्यामुळेच वीज गळती व थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. स्वाती दंताळ, रहिवासी
जीटीएल अपयशी
ग्राहकांना चांगली सेवा देण्यात जीटीएल अपयशी ठरले आहे. स्वत:ची कार्यक्षमता फोल ठरल्याने भारनियमनाचे सोंग उभे केले आहे. यामुळे थकबाकी वसूल होणार आहे का? स्वप्ना कोरान्ने, रहिवासी
रुग्णांचे हाल
घरात ऑक्सिजनवर ठेवलेले रुग्ण आहेत. वीज बंद असली की त्यांना रुग्णालयात घेऊन गेल्याशिवाय पर्याय नसतो. लहान मुले व ज्येष्ठांना उकाड्याचा त्रास सहन होत नाही. अस्मिता देसाई, रहिवासी
जीटीएलचे दिवस भरत आले
भारनियमन सुरू करण्याची काय गरज आहे. दररोज वीजपुरवठा खंडित केला जात आहे. जुने मीटर बदलून नवीन लावले आहेत. अव्वाच्या सव्वा बिल येत आहे. प्रशांत क्षीरसागर, रहिवासी
कुठल्या आधारे भारनियमन?
आम्ही नियमित बिलांचा भरणा करतो. मग कुठल्या आधारे भारनियमन करता? जे ग्राहक बिल भरत नाहीत अथवा विजेची चोरी करतात त्यांच्याविरोधात कडक धोरण राबवा. विनायक जोशी, रहिवासी