आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीटीएलला ‘करारी’ नोटीस; करार रद्द करण्याचा महावितरणचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहराला उत्तम सेवा देण्यात जीटीएल अपयशी ठरले आहे. वीज गळती, थकबाकी वाढत असताना जीटीएलने भारनियमन करण्याची परवानगी मागितली आहे. जीटीएलच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. याचबरोबर जीटीएलने महावितरणचे 222.47 कोटी रुपये थकवले असल्याने करार रद्द का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस मुंबईच्या महावितरण कार्यालयाने जीटीएलला बजावली आहे.
शहरातील वीज गळती कमी व्हावी, योग्य बिल, अखंडित विजेची अपेक्षा जीटीएलकडून होती. पण गेल्या तीन वर्षांत जीटीएल यात अपयशी ठरले आहे. दुसरीकडे जीटीएलने नियमितपणे महावितरणकडे वीज बिलाचा भरणा केलेला नसल्याने महावितरणतर्फे करार रद्द करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देखभाल-दुरुस्ती, मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी व नवीन वाहिन्या टाकण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून शहरात दररोज तीन ते आठ तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे वीज बिल भरूनदेखील अडीच लाख वीज ग्राहकांना नियमित वीज मिळत नाही. मीटर दिलेले नसतानाही 30 हजार रुपयांपर्यंत वीज बिल नागरिकांना दिले जात आहे. अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारणी, मीटर फॉल्टी असणे यामुळे वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याविरोधात सामाजिक, राजकीय संघटना व नागरिकांनी जीटीएल, महावितरणकडे तक्रारी दिल्या आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी करार रद्द करण्याच्या नोटिसीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, महावितरणने 3 एप्रिल 2014 रोजी करार रद्द करण्यासंबंधी नोटीस बजावली असताना जीटीएलला याची माहिती नसल्याचे समोर आले आहे.
कारवाई शक्य
थकबाकीचे पैसे न भरल्यास करार रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. मात्र जीटीएलने थकीत रकमेपैकी 138 कोटी लगेच भरण्याचे आश्वासन दिले आहे.
-राम सं. दोतोंडे, मुख्य महाव्यवस्थापक, जनसंपर्क विभाग, महावितरण.

माहिती नाही
कारणे दाखवा नोटीस शनिवारी साडेपाच वाजेपर्यंत मिळाली नाही. वरिष्ठांच्या मेलवर आली असल्यास मला सांगता येणार नाही. सोमवारी माहिती घेऊन तुम्हाला सत्य काय आहे ते सांगण्यात येईल.
-समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी, जीटीएल.