आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीटीएल व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जीटीएलने महावितरणकडे रीतसर कारभार दिल्यानंतरही महिनाभर काम करणे आवश्यक होत; पण ४८ तास आधीच काम बंद केले. त्यामुळे शहरवासीयांना चार दिवस अंधारात काढावे लागले. जीटीएलने कराराचा भंग केला असून व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे मत आमदार अतुल सावे यांनी शनिवारी जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत मांडले. या मताशी सहमत होत समिती अध्यक्ष तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी जीटीएलवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे यांनी आठ दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू होता, तर चार दिवस अंधारात काढावे लागल्याचे निदर्शनास आणून देत कशी गैरसोय झाली याबाबत आपबिती सांगितली. खासदार खैरे यांनी आपल्याला याबाबत शेकडो फोन आले. त्याची माहिती देण्यासाठी शंभर फोन महावितरण अधिकाऱ्यांना करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्याची माहिती दिली, तर सावे यांनी जीटीएल व्यवस्थापन यास कारणीभूत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

१ हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न तत्काळ सोडवा
जीटीएलचा करार रद्द झाल्यामुळे १०३२ कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यांच्याकडे कामाचा अनुभव आहे. त्यांना महावितरणने कंत्राटी पद्धतीवर रोजगार द्यावा, अशा सूचना मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना केल्या. यावर शिंदे यांनी नियमाप्रमाणेच कर्मचाऱ्यांची भरती केली जात असल्याचे सांगितले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार सावे यांनीही हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे खैरे यांनी सांगितले. यासाठी महावितरणचे एमडी अजय मेहता व जीटीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.