आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Balasaheb Thorat, Latest News In Divya Marathi

महिला आरक्षणाचा निर्णय योग्य, पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातील स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय योग्य असल्याचे प्रतिपादन महसूल तथा औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संत तुकाराम नाट्यगृहात वैजनाथराव काळे स्मृती प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी फुलंब्री तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांचा उत्कृष्ट कामाबद्दल गौरव करण्यात आला.
त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा शारदा जारवाल, पंचायत समिती सभापती सुनीता भागवत, सरसाबाई वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री थोरात म्हणाले,अंगणवाडी कार्यकर्ती ही खेड्यातील एक बालकांची जबाबदारी सांभाळणारी कार्यकर्ती असून अल्प मानधनावर बाळांना फुलवणारी ती एक आईच आहे.अंगणवाडी कार्यकर्तींना नुकतेच शासनाने मानधन वाढवले आहे, १० हजार रुपये निवृत्तिवेतन दिले आहे. आमदार डॉ. कल्याण काळे म्हणाले, दोन्ही तालुक्यांत मिळून १३५६ अंगणवाड्यांना घड्याळ भेट देण्यात येत आहे. आयएसओ दर्जा देताना लागणारे शुल्क जिल्हा परिषदेमार्फत भरण्यात यावेत. २०३ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात यावे. अंगणवाडी कार्यकर्तींना चतुर्थ वेतनश्रेणी मिळाली पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्या मिळाल्या पाहिजेत, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या. चौधरी म्हणाले की, अंगणवाडी कार्यकर्तींच्या कामामुळे मानवी विकास निर्देशांक वाढविण्याचे मोठे कार्य घडून येत आहे. अंगणवाडी आयएसओ दर्जात औरंगाबाद जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या वर्षी २०० अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कार्यक्रमास माजी आमदार नामदेवराव पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, संग्राम शिंदे, प्रकल्प अधिकारी स्नेहा देव, रिता पाटील, गणेश पुंगळे तसेच काकासाहेब कोळगे, सुदाम मते आदी मान्यवर, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, पर्यवेक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ काळे यांनी आभार मानले.