आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा मजला मीच बांधेन, मुक्तिसंग्राम संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचा दुसरा मजला मीच बांधेन. त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देईन, अशी ग्वाही पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्रिपद सोपवताना एका महिन्यात उद्घाटन झालेच पाहिजे, असा आदेश दिला होता. म्हणून लगेच निधी मिळवून दिला, नसता आणखी काही वर्षे हे संग्रहालय झालेच नसते, असेही ते म्हणाले.
सिद्धार्थ उद्यानाच्या हिरवळीवर रविवारी सायंकाळी या संग्रहालयाचा उद््घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने तेथे खासदार चंद्रकांत खैरे व पालकमंत्री रामदास कदम यांच्यात चांगला कलगीतुरा रंगला. त्यात पालकमंत्री कदम यांनी बाजी मारत खैरे यांची जाहीर अडचण करून टाकली. या संग्रहालयाच्या कामासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी एकाच दिवसात पाच कोटी रुपये मंजूर करून दिल्याने ही वास्तू पूर्ण झाली, असे गौरवोद््गार आधीच्या वक्त्यांनी काढले. रामदास कदम यांचे नाव उच्चारल्यावर जोरदार टाळ्या व घोषणाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. नंतर खासदार खैरे यांनी आपल्या भाषणात संग्रहालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम लवकरच करायचे आहे, असे सांगत थेट पालकमंत्र्यांनाच या कामासाठी आणखी पाच कोटी रुपये निधी द्या, अशी जाहीर सूचना केली. एकदा सोडून दोनदा सूचना करताना त्यांना आपली गफलत लक्षात आली व त्यांनी मी पण निधी देईन, असे जाहीर केले. खैरे यांनी असे जाहीर आदेशवजा सूचना देणे न रुचल्याने रामदास कदम यांनी आपल्या भाषणात खैरे यांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, मला उद्धवजींनी पालकमंत्री म्हणून नेमले आणि इकडे येताना सक्त आदेश दिले की, संग्रहालयाचे महिनाभरात उद््घाटन करायचे आहे. ते कसे करायचे ते बघा. त्यामुळे आल्या आल्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ पाच कोटी रुपये दिले. मला वाटते, मला येथे पाठवले नसते तर आणखी दोन पाच वर्षे तरी याचे उद््घाटन झाले नसते. कदम यांच्या या विधानावर जोरदार टाळ्या पडल्या. दुसऱ्या मजल्याबाबत खैरे यांनी दिलेल्या आदेशवजा सूचनेचा जाहीर वचपा काढत कदम म्हणाले की, या संग्रहालयाचा वरचा मजलाही झालाच पाहिजे. मी उद्धवजींना सांगू इच्छितो की खैरे म्हणाले म्हणून नाही, पण या संग्रहालयाला पूर्णत्व यावे म्हणून मी वरचा मजला मीच करेन हे जाहीर करतो. खैरे यांच्या साक्षीने आणि खैरे यांच्या साक्षीविना सांगतो की हा मजला होणारच. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती असो की आणखी काही लागेल तेवढा पैसा उपलब्ध करून देतो!
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कदम, खैरे यांच्या चकमकीची तीव्रता लगेच लक्षात आली. कदमांच्या टोल्यांवर उपस्थितांनी दिलेला प्रतिसादही लक्षात आला. त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणात डॅमेज कंट्रोल केले. आता खैरे काही म्हणाले, त्यांना कदम काही म्हणाले. ही त्यांची मस्करी होती. नाही तर उद्या लगेच मीडियात वादावादीच्या चौकटी येतील, असे म्हणत ठाकरे यांनी या वादाला हलकेफुलके रूप देण्याचा प्रयत्न केला.
खैरे, बोलू नका...
रामदास कदम भाषण करत असताना खैरे आपल्या जागेवरून उठून ठाकरे यांच्या शेजारी जाऊन बसले व त्यांच्या कानाशी लागून काहीतरी बोलत होते. त्याच वेळी कदम हे ठाकरे यांना उद्देशून काही बोलत होते. त्यांचे लक्ष खैरे यांच्याकडे जाताच ते म्हणाले की, खैरे बोलू नका. थांबा जरा. माझ्या आणि उद्धव साहेबांच्या मध्ये जास्त वेळ येऊ नका! त्यांच्या या टोल्याने खजिल झालेल्या खैरे यांनी जागाच बदलली.