आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरवासीयांचा पाडवा गोड, पण ग्रामीण भागात संक्रांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानल्या गेलेल्या गुढीपाडवा सणाला यंदा दुष्काळाच्या झळा बसल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे लोक खरेदीसाठी शहरात आले नाहीत. त्यामुळे गेल्यावर्षी या सणाला सुमारे २५० कोटींची उलाढाल झाली होती, ती यंदा दीडशे कोटींवर आली. लग्नसराईच्या निमित्तानेच ग्रामीण भागातील लोक शहरात खरेदीला आले होते. मात्र, एकूण ग्राहकांत त्यांचे प्रमाण फक्त १५ टक्केच होते. गेल्या वर्षी ते ३० टक्के होते.
शहरी नागरिकांनी दुचाकी, चारचाकी, कपडा आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारात मोठी खरेदी करत एकूण खरेदीत ८५ टक्के वाटा उचलला, तर ग्रामीण भागातील कुटुंबांचे प्रमाण केवळ १५ टक्के होते. पण तेही पाडव्यानिमित्त नसून विवाह सोहळ्यांमुळे त्यांनी खरेदी केली. यंदा पाडव्याला १५० कोटींच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

ऑनलाइन खरेदीचा फार परिणाम नाही
ई-कॉमर्सवेबसाइट अर्थात ऑनलाइन खरेदीचा इलेक्ट्रॉनिक्स बाजारावर परिणाम होईल अशी शंका होती. मात्र, मोबाइल आणि होम अप्लायन्सेस वगळता इतर कुठल्याही वस्तूंच्या विक्रीवर परिणाम झालेला नाही. फ्रिज, एसी प्रत्यक्ष पाहूनच खरेदी करण्यालाच प्राधान्य दिले गेले. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून विवाह सोहळ्यांसाठी खरेदी करण्यात आली, असे धनंजय पांडे यांनी सांगितले.

सोने व्यापार पूर्णपणे ठप्प : दिवाळी,दसरा, पाडवा अन् अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गरीब व्यक्तीदेखील गुंजभर का होईना सोने खरेदी करते. मात्र, यंदा गेल्या ३७ दिवसांपासून सराफा असोसिएशनने बंद पुकारल्याने पहिल्यांदाच पाडव्याला सोने खरेदीचा मुहूर्त टळला आहे. "दिव्य मराठी'ने दोन दिवसांपूर्वी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे तर शहरातील बंद काटेकोरपणे पाळला गेला.
कपडा व्यापार
शहरी ग्रामीण
०५%२५ %
इलेक्ट्रॉनिक्स
८५%१५%
ट्रॅक्टर
०१%०९%
दुचाकी
७०%३०%
फोर व्हीलर
९९%०१%

यंदा ग्रामीण भागातून शून्य व्यवसाय
गेल्या वर्षांपासून ग्रामीण भागातील व्यवसायावर परिणाम झाला आहे. यंदा ग्रामीण भागात चारचाकींची विक्री शून्यावर आली. शहरी भागात आता कार म्हणजे लक्झरी नसून गरजेचा भाग झाली आहे. शिवाय नोकरदारांना परवडणाऱ्या किमतीत कार आहेत. त्यामुळे शहरात ७५० कार विक्री झाल्याचा अंदाज आहे.

इलेक्ट्रॉनिक्समध्ये १५ कोटींचा व्यवसाय
एअर कंडिशनर, कुलर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यांची पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी विक्री झाली. त्याखालोखाल एलईडी टीव्हीची विक्री झाली. इलेक्ट्रॉनिक बाजारात जवळपास १५ कोटींचा व्यवसाय झाला. यामध्ये ८५ टक्के शहरी ग्राहक, तर १५ टक्के ग्रामीण ग्राहकांचा समावेश आहे.

दुष्काळाचा दुचाकी विक्रीला फटका
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्केच व्यवसाय झाला. संपूर्ण शहरात ८०० च्या आसपास दुचाकींची विक्री झाली आहे. त्यामध्ये शहरी ग्राहकांचे प्रमाण ७० टक्के होते. दुष्काळाचा परिणाम दुचाकी विक्रीवर झाल्याचे विशाल पांडे यांनी सांगितले.