आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी आलेल्या पाहुणाचे 21 तोळे दागिन्यांची चोरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडको एन -6, संभाजी कॉलनीतील रहिवासी सतीश सुभाष रावझगडे यांच्या घरी आलेल्या पाहुण्याचे 21 तोळे सोने आणि रोख 17 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी पहाटे चार ते सहा वाजेच्या सुमारास घडली. चोरट्याचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाची मदत घेण्यात आली असता श्वान घरातच घुटमळल्याने घरातील सदस्यांभोवतीच संशयाची सुई फिरत आहे.

सतीश रावझगडे हे चितेगाव येथील बडवे इंजिनिअरिंगमध्ये कामाला आहेत. ते आई, वडील आणि पत्नीसह सिडको संभाजी कॉलनीत राहतात. त्यांच्या आत्याच्या मुलीवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांची आत्या आणि नातेवाईक रावझगडे यांच्याकडे गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुक्कामी आहेत. शनिवारी रात्री नऊ वाजता आत्या आणि नातेवाइकांनी त्यांच्याकडील दागिने रावझगडे यांच्या पत्नीकडे सुपूर्द केले. रुग्णाला जेवणाचा डबा देऊन पाहुणे घरी परतल्यानंतर रात्री दहा वाजता इमारतीच्या मुख्य दाराला कुलूप लावून सर्वजण झोपले. रविवारी सकाळी साडेसात वाजता पाहुण्यांचे दागिने चोरीस गेल्याची बाब लक्षात आली.

पोलिसांसमोर आव्हान
विशेष म्हणजे के वळ पाहुण्यांचेच दागिने आणि पैसे चोरीला गेले. कपाटातील दुसर्‍या खणात रावझगडे यांच्या पत्नी आणि आईचे दागिने होते. या दागिन्याला चोरट्यांनी हातही लावला नाही. दागिने ठेवलेले कपाट दुसर्‍या मजल्यावरील स्वयंपाकघरात आहे. सकाळी साडेसात वाजेपासून ते दुपारी दोनपर्यंत पोलिस या चोरीचा तपास करत होते. रावझगडे यांची बहीणही शेजारीच राहते. तिच्या दारात मुख्य दरवाजा आणि चोरी झालेल्या खोलीच्या किल्ल्या सापडल्या. पोलिसांचे श्वानही घरात घुटमळले. त्यामुळे चोर कोण याचा तपास पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप बाविस्कर, उपनिरीक्षक शिल्पा लंभे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस संशयित नातेवाइकांची चौकशी करीत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एम. राजपूत पुढील तपास करीत आहेत.
इमारतीतील व्यक्तीवर संशय
ही चोरी बाहेरील चोरट्याने केली नसावी, असा आमचा कयास आहे तरीही आम्ही सर्व बाजू तपासून पाहत आहोत. चोरीचा तपास नक्कीच लागेल. श्वानही घरातच घुटमळले. ही चोरी इमारतीच्या आतील व्यक्तीनेच केल्याचा संशय आहे. अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त