आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण आणि बेरोजगारीवर विद्यार्थ्यांचे भाष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण, बेरोजगारी अशा विविध विषयांवर नाट्यउतारा वाचनातून विद्यार्थ्यांनी भाष्य केले. पाणी वाचवाचा संदेश देत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्कारक्षम पिढी कशी आवश्यक आहे, हे अधोरेखित करून उपस्थितांची मने जिंकली.
गुजराती कन्या विद्यालयात बुधवारी (11 डिसेंबर) पद्मविभूषण स्व. गोविंदभाई श्रॉफ स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित आंतरशालेय नाट्यउतारा सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन नाट्यकर्मी सीमा मोघे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजराती समाज विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र कापडिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून वसंत हौजवाला, शैलेश पटेल, उल्हास पटेल, राजेश मेहता, त्र्यंबक पटेल, शिलाबेन गुजराथी यांची उपस्थिती होती. रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ कादंबरीतील पात्रे साकारण्यात आली. राजमाता जिजाऊ, मिर्झा राजे जयसिंग आदी पात्रांची वेशभूषा करून आणि सहअभिनयाद्वारे सादरीकरण करण्यात आले. स्त्री भ्रूणहत्या मोठय़ा प्रमाणात होत असल्याने मुला-मुलींच्या प्रमाणात होणारी तफावत थांबवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. पाणी वाचवले तरच जीवन वाचेल. जगण्यासाठी पाण्याचे महत्त्व नाकारून चालणार नाही. त्यामुळे जलपुनर्भरण, जलसाठवण कशी करायची यावर उपाययोजनाही सुचवल्या. ग्लोबल वॉर्मिंगचीही जागतिक समस्या निर्माण झाली आहे. यासाठी प्रदूषण टाळून पर्यावरण टिकवणे, ही काळाची गरज असल्याचेही सुचवण्यात आले. बेरोजगारीच्या समस्येवरही भाष्य करण्यात आले.
नाट्यकलावंत सीमा मोघे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारी ही स्पर्धा असून यातून चांगले कलावंत घडवण्यास मदत मिळेल. अध्यक्षीय समारोप नरेंद्र कापडिया यांनी केला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. र्शीहरी कोकरे, प्रा. सुमीत साळवे, प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले होते. र्शद्धा पटेल यांनी सूत्रसंचालन केले.

हे आहेत स्पर्धेतील विजेते..
सांघिक गट - प्रथम - महाराष्ट्र पब्लिक स्कूल.
वैयक्तिक गट - शर्मिष्ठा पांडे- प्रथम, प्रथमेश रत्नपारखी- द्वितीय, कार्तिक कुलकर्णी- तृतीय, उत्तेजनार्थ- शिवम डिक्कर, ज्योती चंदे.
उत्कृष्ट अभिनय - अभिजित खंडेश पाटील.
उत्कृष्ट वेशभूषा-प्रथमेश रत्नपारखी,
रंगभूषा - शिवम डिक्कर,
नेपथ्य - शर्मिष्ठा पांडे, संगीत- गौरी मनगटे आदी.