आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या बेवारस कारने खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दहशतवादी गुजरातमार्गे महाराष्‍ट्रात घुसल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने पोलिसांना दिली असून सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा स्थितीत गुजरात पासिंग असलेली नवी कोरी फॉक्स वॅगन कार शनिवारी (11 मे) गारखेड्यातील रिलायन्स मार्टच्या पार्किंगमध्ये बेवारस स्थितीत आढळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी ती गाडी जप्त केली आहे.

दहशतवादी शहरात घुसल्याची सूचना मिळाल्यामुळे एटीएस आणि राज्य गुप्तचर यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. गर्दीची ठिकाणे, मॉल, रेल्वेस्टेशन, बसस्थानके, चित्रपटगृहांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यातच गुजरातमधील फॉक्स वॅगन कार (जीजे 26 ए. 3040) शनिवारी दुपारी दोन वाजेपासून बेवारस स्थितीत उभी होती. हिच कार मागील आठ दिवसांपासून मॉल परिसरात घिरट्या घालत होती. शुक्रवारी ही कार मॉल शेजारी असलेल्या मनपाच्या शटरजवळ उभी असल्याचे सुरक्षा रक्षकांनी पाहिले होते. त्यामुळे या कारचा संशय आल्याने मॉलच्या कर्मचा-यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला या बेवारस कारबद्दल सांगितले. कारचा मालक कोण आहे, याचा शोध पोलिस घेत असून रविवारी गुजरात पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर पंधरा मिनिटांत बॉम्बशोधक पथक मॉलमध्ये दाखल झाले. त्यांनी कारची कसून तपासणी केली. कारच्या एका बाजूची काच फोडून त्यातील तपासणी करण्यात आली. कार क्रेनच्या मदतीने ठाण्यात उभी करण्यात आली आहे.

रिलायन्स कंपनीचे मालक अनिल अंबानी यांच्या जीवितास धोका असल्याच्या कारणावरून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर रिलायन्स मॉलमध्ये घातपात घडण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने हीच कार मॉलच्या बाहेर दिवसभर उभी केली होती. कोणी चौकशी करीत नसल्याचा अंदाज घेत ती कार शनिवारी दुपारी दोन वाजता मॉलच्या पार्किंगमध्ये उभी करण्यात आली.

उदगीरच्या हिमायत बेगला फाशीची शिक्षा सुनावल्यापासून दहशतवादी सक्रिय झाल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. महाराष्‍ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादचे नाव अतिरेक्यांच्या लिस्टमध्ये आहे. त्यादृष्टीने शहरातील पोलिसांना सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत.

गुजरात पोलिसांकडे चौकशी
मॉलमधील बेवारस कारचे विद्युत कनेक्शन तोडून ती जप्त करण्यात आली आहे. वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यासाठी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला जात आहे.’’
भीमराव मोरे, पोलिस निरीक्षक.

मॉलमध्ये दररोज व्हिजिट
हैदराबाद स्फोटानंतर एटीएस यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या सर्व ठिकाणांवर आणि मॉलमध्ये दररोज व्हिजिट करतो. संबंधित गाडीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.’’
नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक, एटीएस