आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गोरखपूरच्या 60 मुलांचा खूनच; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, गुलाम नबी आझाद यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऊत्‍तर प्रदेशमधील गोरखपूरच्या रुग्‍णालयात ऑक्सिजनच्या अभावी जवळपास 70 बालकांचा मृत्यू झाला आहे. - Divya Marathi
ऊत्‍तर प्रदेशमधील गोरखपूरच्या रुग्‍णालयात ऑक्सिजनच्या अभावी जवळपास 70 बालकांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद- गोरखपूरची घटना ही केवळ मुलांचा मृत्यू नसून तो खून आहे. ऑक्सिजन कमी असल्याच्या बातम्या घटनेच्या दहा दिवस अगोदरपासूनच येत होत्या. मात्र राज्य सरकार व मेडिकल कॉलेज प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.
 
आमच्या पक्षात या, अन्यथा सीबीआय-ईडीच्या माध्यमातून चौकशी करू,  ही नवीन लोकशाही भाजपने आणली आहे, असा आरोपही आझाद यांनी केला आहे. ते रविवारी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.   
 
सर्वाधिक निधी गोरखपूरसाठी
आझाद म्हणाले, घटनेनंतर गोरखपूरला मी भेट दिली. डॉक्टर, नर्स, शिपाई, पेशंट सर्वांसोबत दोन तास चर्चा केली. ऑक्सिजन कमी असल्यामुळे या घटना झाल्या. दहा दिवसांपासून वर्तमानपत्रात ऑक्सिजन कमी असल्याच्या बातम्या छापून येत होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. राज्य सरकारने अॅक्शन घेतली नाही म्हणून ही घटना घडली. पण मुख्यमंत्री यापूर्वीही असे मृत्यू होत असल्याचे सांगत आहेत.
 
मात्र माझ्यापेक्षा जास्त गोरखपूर कोणाला माहिती नाही. उत्तर प्रदेशचा कोणताही मंत्री आणि  मुख्यमंत्र्यांपेक्षा मी गोरखपूरचा केंद्रीय आरोग्यमंत्री असताना आढावा घेतलेला आहे. त्या वेळी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १७ वेळेस गोरखपूरला भेटी दिल्या होत्या. मी तीन वेळा गेलो होतो. या ठिकाणी मुले मरत असल्यामुळे देशात सर्वाधिक निधी मी दिला. २०११ मध्ये काम सुरू झाले. जिथे ३००० मुले दरवर्षी मरत होती ते प्रमाण आम्ही दीडशेवर आणले. त्यामुळे योगी आदित्यनाथ इतरांना मूर्ख बनवू शकतात, मला नाही. मुख्यमंत्री आपला मतदारसंघ सांभाळू शकत नाहीत तर यूपीच्या करोडो लोकांची काय सुरक्षा करणार.   
 
रिअल इस्टेट संपवले  : नव्या सरकारने राज्यातला रिअल इस्टेट व्यवसाय संपवला आहे. या व्यवसायामधून सर्वाधिक रोजगार मिळत होता.   राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.  औद्योगिक आणि शेतीमधून रोजगार शून्य झाला आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवार आमच्यासोबतच  
शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्यामुळेच ते यूपीएच्या बैठकीला आले नाहीत. पण ते यूपीएसोबत असल्याचे आझाद यांनी स्पष्ट केले. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, आमदार अब्दुल सत्तार, नामदेव पवार उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...