आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मग्रंथांतील संस्कारमूल्य सर्वांमध्ये रुजवण्याची गरज - अण्णासाहेब मोरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘भगवद्गीता,रामायण, महाभारत, कुराण, बायबल या ग्रंथांमध्ये संस्कारमूल्य खच्चून भरलेले आहे. मात्र, त्यातील चांगल्या बाबींचा उपयोग करून घेण्यास आपण कमी पडत आहोत. यावर वादविवाद वाढवण्यापेक्षा संस्कारमूल्यातून धर्म, संस्कृती, शिक्षण, शेती आदींची सांगड घालणे उचित ठरेल. राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी ते आवश्यक आहे,’ असा उपदेश गुरुमाउली प. पू. अण्णासाहेब मोरे यांनी केला.

अण्णासाहेबांनी शुक्रवारी "दिव्य मराठी'ला सदिच्छा भेट दिली. "दिव्य मराठी'चे सीओओ निशित जैन, जाहिरात व्यवस्थापक सुभाष बोंद्रे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी अण्णासाहेब म्हणाले की, आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये आत्मज्ञानाचा समावेश नाही. या शिक्षणात केवळ भौतिक तत्त्वे आणि शारीरिक गरजांकडे विशेष लक्ष देण्यात अाले असले तरी संस्कारमूल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचा अभाव असल्यामुळे अाज अनेक गंभीर समस्या निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी बाेलून दाखवली.

संस्कारमूल्याचेपतन हेच समस्यांचे मूळ कारण
"भगवद्गीताराष्ट्रीय ग्रंथ करण्याची मागणी, बळजबरीने धर्मांतर कितपत योग्य आहे? आसारामबापू, रामपाल यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे भक्तांनी कोणावर अन् कसा विश्वास ठेवावा?' या प्रश्नांवर अण्णासाहेब म्हणाले, ‘सर्व समस्यांचे मूळ कारण संस्कारमूल्याचे पतन हेच आहे. सर्वच ग्रंथांमध्ये संस्कार आणि ज्ञान भरपूर आहे; पण आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे कौटुंबिक कलह, बलात्कार, खून, भ्रष्टाचारासारखे गैरप्रकार वाढल्याने समाज अस्वस्थ झाला आहे. यावर मात करायची असेल तर सत्य, सरलता, धैर्य, चारित्र्य, हे सद्गुण अंगीकारण्याची आवश्यकता आहे. तसेच दूरदृष्टी ठेवून समाजहितासाठी शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे. '

‘आपल्या देशातील वनसंपदा धोक्यात आली आहे. अनमोल औषधी वनस्पती नष्ट झाल्या आहेत. डोंगर, जंगलावर घाला घातला जात असल्याने हवामानात बदल होत आहेत. त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. देशातील शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे.

कीटकनाशके रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतीचा पोत अतिशय खालावला आहे. नापिकीमुळे कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. रासायनिक खत फवारणी केलेल्या भाज्या, धान्यांमुळे कॅन्सरसारखे आजार बळावत आहेत. शेतकऱ्यांची मुले नोकरी करण्याच्या उद्देशाने शिक्षण घेतात. त्यापेक्षा त्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा शेती कुटुंब, गाव, जिल्हा, राज्य राष्ट्राच्या उन्नतीसाठी कसा फायदा करून घेता येईल, यावर भर दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा अण्णासाहेबांनी व्यक्त केली.

सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या
"शेती पिकवण्यासाठी पुढाकार घ्या. सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जावे. घर तेथे गोधन असावे. या धनापासून दूध, लोणी, तूप मिळेलच; पण शेतीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय खत मिळेल. ते शेतात टाकले तर शेती भरभरून पिकेल. मानवी आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल. हा आमूलाग्र बदल करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा,' असे आवाहन अण्णासाहेबांनी केले.