आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रचार-प्रसाराच्या अभावाने गुटख्याला चालना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्य सरकारने गुटखा उत्पादन, वितरण, साठवण व विक्रीवर बंदी आणली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात सुमारे 80 टक्के गुटखा विक्री थांबली, पण अजूनही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने चढय़ा भावात विक्री होत आहे. ते रोखण्यासाठी अन्न व औषध विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत, पण पूर्णपणे गुटखा बंदी अमलात येण्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. त्यामुळे लोकसहभागासाठी प्रशासनाकडून गुटखा बंदीसाठी प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.
गुटखा वितरण व विक्री करणार्‍याला 25 हजार ते 1 लाखापर्यंत दंड लावण्याची तरतूद गुटखा बंदी कायद्यात करण्यात आली आहे. कारवाईची धास्ती घेऊन अनेकांनी अगोदरच गुटखा विक्री बंद केली आहे, तर ठोक विक्रेत्यांनीही गुटख्याचे वितरण बंदीपूर्वीच बंद केले. ज्यांच्याकडे गुटखा उपलब्ध होता, त्यांना तो जाळून नष्ट करण्याचे आदेश होते. मात्र तो गुटखा नष्ट न करता त्याची छुप्या मार्गाने विक्री करण्यात येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच नागरिकांचेही सहकार्य मिळत नसल्याने गुटखा बंदी अंमलबजावणीची समस्या जटिल होत आहे. लोकांनी नाकारले अथवा प्रशासनाला गुटखा विक्री होत असल्याची माहिती दिल्यास गुटख्याचे समूळ उच्चाटन सहज होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सह. आयुक्त डी. एम. शाह यांनी सांगितले.