आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हडकोतील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: हडको एन-11 स्मशानभूमीचे तीन वर्षांपासून रखडलेले काम तत्काळ मार्गी लावा, असे स्पष्ट आदेश महापौर अनिता घोडेले यांनी अधिकार्‍यांना दिले. डीबी स्टारने या प्रश्नाला वाचा फोडताच त्यांनी खास बैठक घेऊन अधिकार्‍यांना सूचना दिल्या.
जळगाव रोडवरील हडको एन-11 भागात नागरी वसाहतीत असलेल्या स्मशानभूमीमुळे द्वारकानगर, नवजीवन कॉलनीतील लोक हैराण झाले होते. ठेंगणी सुरक्षा भिंत आणि अग्निसंस्कारासाठी असलेल्या ओट्यांची जास्त उंची यामुळे तेथे रोज जळणार्‍या चिता पाहाव्या लागत होत्या. त्याचा धूर आसपासच्या वसाहतीत पसरत होता. या स्मशानभूमीच्या सुरक्षा भिंतीची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यासाठी लोकशाही दिनात सात वेळा तक्रारी केल्या होत्या. निधी मंजूर होऊनही बोळवण केली जात होती. अखेर या प्रश्नाला डीबी स्टारने 2 जून रोजी ‘लोकशाही दिनाची थट्टा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन वाचा फोडली. त्याचा अपेक्षित परिणाम झाला व महापौरांनी वृत्त प्रसिद्ध होताच नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला शहर अभियंता एम.डी.सोनवणे, प्र.उपअभियंता अफसर सिद्दिक ी,वॉर्ड अभियंता एस.एल.पवार, ठेकेदार सचिन पहाडे,शाखा अभियंता व्ही.के.गोरे हे उपस्थित होते. महिनाभरात हे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाठपुरावा करणार
मी महापौरांच्या तत्काळ निधीतून 17 लाख 39 हजार रुपये मंजूर केले. प्रस्ताव पाच वेळा शून्य बजेटमध्ये आला. त्यात ठेकेदाराच्या थकबाकीच्या प्रश्नात प्रस्ताव अडकला. मात्र डीबीस्टारच्या वृत्ताने मला पाठबळ मिळाले आणि आता मी पाठपुरावा सुरू केलाय. बैठकीत ठरल्याप्रमाणे एका महिन्यात काम मार्गी लागेल.
-किशोर नागरे, नगरसेवक
आता काम होईल
थोडी प्रशासकीय अडचण आहे. पण त्यातून मार्ग निघाला आहे. त्यामुळे आता मात्र एका महिन्यात काम पूर्ण होईल.
-अफसर सिद्दिकी, प्र.उपअभियंता
बैठक घेऊन सूचना दिल्या
या प्रकरणी माझ्या दालनात बैठक झाली. आता स्मशानभूमीचे काम लवकर सुरू होईल. साधारण महिनाभरात काम मार्गी लागेल.
-महापौर अनिता घोडेले