आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारांचा पाऊस काढणीला आलेली पिके आडवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज-वाळूज परिसरात सोमवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसाने काढणीला आलेलीह गहू, ज्वारी व हरभरा ही पिके भुईसपाट झाली. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल तासभर झालेल्या पावसामुळे खाम नदीला पूर येऊन ती खळाळून वाहिली.
वाळूजसह गोलवाडी, बनवाडी, पाटोदा, वळदगाव, पंढरपूर, गंगापूर नेहरी, नायगाव, हनुमंतगाव, केसापुरी, वाळूजवाडी, नारायणपूर, लांझी, पिंपरखेडा, शेंदुरवादा, मेंदीपूर भागातून खाम नदी वाहते. वाळूज परिसरातील शेतकर्‍यांनी खाम नदीतील पाणी पाइपलाइन टाकून शेतीला घेतल्यामुळे नदीकाठच्या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर बागायतीचे क्षेत्र वाढले आहे. अनेकांनी गहू, हरभरा, ज्वारी आदी रब्बी पिके घेतली. सर्वच पिके काढणीला आलेली आहेत. सोमवारी रात्री सव्वानऊनंतर सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटांसह सुमारे तासभर धो-धो सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसाचा जोर अधिक असल्याने अनेकांची घरे गळाली, तर कित्येकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले.
पिके आडवी : रब्बी पिकांची खळी करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला होता. त्यासाठी मळणी यंत्र व मजुरांची जुळवाजुळवी केली जात होती. अशातच वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी आदी उभी पिके भिजून आडवी झाली. पावसात भिजल्याने गहू व ज्वारीच्या दाण्यांचा रंग बदलणार असल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
वीजपुरवठा खंडित : वादळ आणि पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीत आणखी भर पडली. बजाजनगर कामगार वसाहतीसह जोगेश्वरी, रांजणगाव शेणपुंजी, कमळापूर, रामराई, वाळूज, पंढरपूर परिसर काळोखात बुडाला होता. दोन तासांच्या खंडानंतर सुरू झालेला विद्युतपुरवठा रात्री उशिरापर्यंत वारंवार खंडित होत राहिला.
पंचनाम्यांची मागणी : शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे महसूल विभागातर्फे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी रत्नाकर शिंदे, रामविलास पेरे, आसाराम जमधडे, संतोष बोहरा, रमेश भुजंग, कैलास बिलवाल, सुनील गंगवाल, प्रकाश वाघचौरे, नाना आरगडे, रमेश भवर आदी शेतकर्‍यांनी केली आहे.