आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांची थट्टा: वाताहत ५० हजारांची, हाती मदत ३७ रुपये!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सरकारच्या लालफीतशाहीचा फटका सिल्लोड तालुक्याच्या धोत्रा गावातील शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या मार्चमधील गारपिटीत एका शेतकऱ्याच्या घराची पडझड झाली. जोडधंदा म्हणून पाळलेल्या ३० कोंबड्या दगावल्या. ५० हजारांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात मात्र ३७ रुपयांचा धनादेश देण्याचे औदार्य दाखवून शासनाने भरपाई म्हणून आठ अंड्यांची किंमत त्यांच्या हाती टेकवल्याचा प्रकार समोर आला.

धोत्र्यासह उंडणगाव व इतर गावांतही अस्मानी संकट कोसळले होते. तहसील विभागाने नुकसानीचे पंचनामे करून जुलै महिन्यात भरपाई दिली. तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही मदत एक महिना स्वीकारली नव्हती. मात्र, पर्याय नसल्याने ही रक्कम स्वीकारली. गावातील सात जणांचे प्रत्येकी ३० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांना केवळ ३७ ते ८० रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. यात बिजेसिंग दादा जाधव यांची ३० हजार रुपये किमतीची म्हैस गारपिटीत जखमी झाली. मात्र, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हैस दगावल्यानंतर पंचनामा करण्याचे फर्मान सोडले. दुसऱ्याच दिवशी म्हैस दगावल्यावर तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. प्रभाकर बावस्कर यांच्याकडे ६० कोंबड्या होत्या. त्याची किंमत ३० हजार रुपये होती. पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्याने केवळ ३० कोंबड्यांची भरपाई म्हणून अवघ्या ३७ रुपयांचा चेक देऊन त्यांची बोळवण केली. असाच प्रकार प्रभाकर जाधव यांच्यासोबतही घडला. यांच्या शेतात चार एकरमध्ये मका, हरभरा, गहू असे एक ते दीड लाखाचे उत्पन्न असलेला शेतीमाल भुईसपाट झाला. त्याची नुकसान भरपाई म्हणून ९ हजार रुपये दिले.

भरपाई योग्यच : तहसीलदार
^ज्या शेतकऱ्याची एक कोंबडी दगावली त्यालाच ३७ रुपयांचा चेक देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई देण्यात आली आहे. पंचनामा करूनच भरपाई दिली.
- राहुल गायकवाड, तहसीलदार, सिल्लोड

निवेदन दिले आहे
^नुकसान लाखात होऊनही भरपाई १२ ते २० हजार रुपये देऊन शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे.
-कमलेश कटारिया, मनसे उपजिल्हाध्यक्ष

२० टक्क्यांचीच नोंद
^गारपिटीने सर्व गावांतील शेतकऱ्यांचा शेतीमाल १०० टक्के भुईसपाट झाला होता. मात्र, पंचनाम्यात केवळ २० टक्के नुकसानीची नोंद केली आहे.
-धनराज जाधव, शेतकरी
लाखांचे नुकसान भरपाई १२ हजार
राजेंद्र जाधव यांनी एक लाख रुपये खर्चून दोन एकर मका, अडीच एकर कपाशी, दोन एकर गहू आणि अर्धा-अर्धा एकर हरभरा व कांदा लागवड केली. चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना भरपाई मिळाली १२ हजार.