आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm News In Marathi, Unseasonal Rain, Marathwada

राज्यातील सहा लाख हेक्टर पिके भुईसपाट,मराठवाड्यातील अर्थचक्र गारपिटीमुळे कोलमडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने विदर्भ व मराठवाड्यासह राज्यातील 23 जिल्ह्यांत थैमान घातले आहे. त्यामुळे सुमारे साडेसहा लाख हेक्टरवरील हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यातील सुमारे पावणेतीन लाख हेक्टरवर पाणी फिरले आहे. आगामी दोन दिवस गारपिटीचा हा धोका कायम असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.


बीड व लातूर जिल्ह्यातील पिकांना लहरी निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला. बीड, गेवराई, किल्लेधारूर, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, वडवणी, शिरूर कासार तालुक्यात तर रस्त्यांवर अक्षरश: गारांचा खच पडला होता. जिल्ह्यातील रबी पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गोदामाची पत्रे उडाल्याने साठ हजार पोती साखर भिजली. अनेक घरांवरील पत्रे उडाले तर झाडेही उन्मळून पडली. तर औरंगाबाद जिल्ह्यातील 83 हजार हेक्टरवरील पिकांनाही फटका बसला.


जालना जिल्ह्यातील 33, 343 हेक्टरवरील शेती व फळपिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतक-यांनी गतवर्षी घेतलेले कृषी कर्ज फेडायचे कसे? असा यक्षप्रश्न बळीराजासमोर उभा आहे. लातूर जिल्ह्यातील 45 हजार एकरवरील हरभरा, गहू, ज्वारीसह ऊस, द्राक्ष, डाळिंब, आंबा पिके बाधित झाल्याचे जिल्हाधिकारी विपीन शर्मा यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील 15 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. देगलूर, किनवट तालुक्यांत गारांचा सडा पडला होता. परभरी जिल्ह्यातही हेच चित्र होते. उस्मानाबादेतील द्राक्ष-आंबा उत्पादक शेतक-यांच्या तोंडचे पाणी निसर्गाच्या अवकृपेमुळे पळाले. या जिल्ह्यात 55 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्व जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.


लवकरच मदत : मुख्यमंत्री
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन अहवाल करणे सुरू आहे. आपत्तीग्रस्तांच्या मदतीत आचारसंहितेची अडचण येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात दिली. ते म्हणाले, नुकसानीचा अहवाल आल्यानंतर शेतक-यांना मदत जाहीर केली जाईल.


सीएमशी बोलणार : मुंडे
शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असताना सरकारी मदत तोकडी आहे. यंत्रणा अद्याप सर्व्हेसाठी सरसावली नाही. बीडचे कलेक्टर रजेवर गेले आहेत. नुकसानीसंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना तसेच महसूल सचिवांना पाठवण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करणार असल्याचे खासदार गोपीनाथ मुंडे म्हणाले.


आणखी दोन दिवस धोका कायम
राज्याच्या 23 जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले. आणखी दोन दिवस या संकटाची भीती महाराष्ट्रात कायम असेल. पुढच्या 24 तासात मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्याच्या कृषी विभागाकडून पिकांचे सर्वेक्षण सुरू असल्याचे कृषी विभागाचे सांख्यिकी प्रमुख अनिल बनसोडे यांनी सांगितले.