आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गारपिटीमुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्याने निराश होऊ नये, आत्महत्या करू नये, शासन मदत करेल, असे सांगणार्‍या शासनाने निवडणूक आयोगाची परवानगी घेत भली मोठी मदत दिल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात निम्म्या शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे शासन निर्णयावर नजर टाकल्यानंतर दिसून येते. ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ अशी आपली जुनी म्हण आहे. त्यात शासनाने ‘राजा उदार झाला अन् हाती अर्धाच भोपळा दिला‘ अशी सुधारणा करण्याबरोबरच बळीराजाची चेष्टा केल्याचे दिसून येते.
या वेळी जास्तीची मदत देण्यासाठी निकष बदलल्याचा दावा खोटा असून फक्त हेक्टरी नुकसानीची रक्कम तेवढी वाढवून देण्यात आली आहे. परंतु 50 टक्क्यांच्या वर नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच ती मिळू शकणार आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या वारसालाच 1 लाख रुपये मिळतील. परंतु ती आत्महत्या शासन निकषात झाली असेल तरच दावा करता येईल. औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या 4 शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपैकी 3 आत्महत्या शासकीय निकषात बसत नाहीत.
कर्जवसुलीसाठी लागेल तगादा
22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीत 50 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्रही 50 टक्क्यांच्या आसपास आहे. 50 टक्के नुकसान झालेल्या बँक खात्यावर फूल ना फुलाची पाकळी जमा होईल पण 49.99 टक्के नुकसान झालेल्या शेतकर्‍याला कवडीही मिळणार नाही.
वीज बिलात सवलत, कर्ज परतफेडीत सवलत तसेच पुढील तीन वर्षांकरिता पहिले कर्ज थकीत असतानाही पुनर्गठन करणे या सर्व सवलती 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाच मिळणार आहेत. त्यामुळे निम्म्या शेतकर्‍यांना किरकोळ का होईना थेट आर्थिक मदत मिळणे तर सोडाच, उलट कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा बँकांकडून लागेल, हेही नक्की आहे.
एप्रिलअखेर मिळतील पैसे
नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केले असले तरी आर्थिक मदत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा उजाडेल, असे सूत्रांनी सांगितले आहे. कोणत्या शेतकर्‍याला किती मदत मिळेल, याची यादी तयार केली जाईल. गावातील चावडी, ग्रामपंचायत तसेच कृषी सहायकांच्या कार्यालयीन सूचना फलकावर ती चिकटवली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा होईल.