आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haj House And Vande Mataram Hall Project Issue At Aurangabad, Divya Marathi

हज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृह म्‍हणजे येथील संस्कृतीचे तसेच बंधुभावाचे प्रतीक - मुख्‍यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बहुचर्चित वंदे मातरम् सभागृह आणि हज हाऊस या दोन्हीही प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी झाले. दोन्हीही प्रकल्प एकत्रित होणे हे येथील संस्कृतीचे तसेच बंधुभावाचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अनपेक्षितपणे कार्यक्रमाला हजेरी लावली, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवर झळकत होते ते उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र फिरकले नाहीत.
महसूलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मोहंमद आरिफ खान, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री अब्दुल सत्तार, अल्पसंख्याक विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, सुभाष झांबड, माजी आमदार एम. एम. शेख यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. या दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून 55 कोटी रुपये खर्च होणार असून लवकरात लवकर हे प्रकल्प उभे राहतील, असे टोपे यांनी सांगितले.
5 वाजता सुरू होणारा कार्यक्रम पाऊण तास उशिराने सुरू झाला. मुख्यमंत्र्यांबरोबरच अन्य उपस्थितांना इफ्तारसाठी जायचे असल्यामुळे राजेश टोपे, मोहंमद आरिफ खान आणि स्वत: मुख्यमंत्री अशी तिघांचीच भाषणे झाली. अवघ्या चार मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री चव्हाण यांनी दोन्हीही सभागृहे एकत्र होणे हे बंधुभावाचे प्रतीक असल्याचे सांगितले. वंदे मातरम् सभागृहाची मागणी तीन दशकांची, तर हज हाऊसची मागणी गेल्या दशकापासून होती. आपल्या देशात धार्मिक सौहार्द असल्यामुळेच आपण विकास करू शकलो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
पासपोर्ट कार्यालय सुरू करा
हज यात्रेकरूंसाठी हज हाऊसची निर्मिती होत असताना येथील यात्रेकरूंना पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठी मुंबईला जावे लागते. त्यांची तारांबळ पूर्णत: थांबवण्यासाठी औरंगाबादेत पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी टोपे यांनी या वेळी बोलताना केली. हीच मागणी अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मोहंमद आरिफ खान यांनीही उचलून धरली.
प्राध्यापकांना रोखले
शासकीय महाविद्यालयाच्या 15 प्राध्यापकांना पोलिसांनी कार्यक्रमासाठी आतमध्ये प्रवेशच दिला नाही. या प्राध्यापकांकडे निमंत्रण पत्रिकाही होत्या. ती दाखवल्यानंतर पोलिसांनी त्यांना दुसर्‍या गेटद्वारे आतमध्ये प्रवेश करण्यास सांगितले. मात्र, दुसर्‍या गेटवर उपस्थित पोलिसांनीसुद्धा त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही. अखेर हे प्राध्यापक नाराज होऊन परतले.
जि. प. अध्यक्षांना व्यासपीठावर जागा नाही
या शासकीय कार्यक्रमात अशासकीय नेते-कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. नुकतेच काँग्रेसवासी झालेले माजी आमदार नामदेव पवार यांना व्यासपीठावर स्थान मिळाले, पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदा जारवाल यांना समोर प्रेक्षकांत बसावे लागले. विशेष म्हणजे त्याही काँग्रेस पक्षाच्याच आहेत.
नागरिकांची पाठ
मुख्यमंत्र्यांसह एकूण 7 मंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी मांदियाळी व्यासपीठावर असली तरी नागरिकांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पाचशे आसन क्षमतेचा मंडप रिकामा होता. शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित असल्यामुळे अर्धा मंडप भरू शकला.