आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्मेच पाणी पोहोचणार जायकवाडीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - जायकवाडीसाठी नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडेमधून सोडण्यात येणा-या पाण्याचा सर्वाधिक लाभ नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव या तालुक्यांतील गोदाकाठावर वसलेल्या शेकडो गावांना होणार आहे. या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी बांधलेल्या कोल्हापुरी बंधा-यामुळे परिसरातील दोन-तीन-चार किलोमीटर परिसरातील विहिरींना या पाण्याचा लाभ होणार असून मराठवाड्याच्या नावाने सोडण्यात आलेल्या ७.८९ टीएमसी पाण्यापैकी निम्मेदेखील पाणी जायकवाडीत येईल का नाही याविषयी शंका आहे.

वरील धरणांमधून पाणी सोडण्यापूर्वी प्रवरा व मुळा नद्यांमध्ये काही प्रमाणात पाणी होते. मात्र, त्यावर बांधलेल्या आठ ते दहा कोल्हापुरी बंधारे रिकामे होण्याच्या मार्गावर होते. सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हे बंधारे पुन्हा भरून त्याचा फायदा नगर जिल्ह्याला होणार आहे. त्यामुळे त्यांचा फायदा शेकडो हेक्टर जमिनीला होणार आहे. पाणी मिळणे शक्य होणार आहे. दुष्काळग्रस्त गंगापूर-वैजापूर तालुक्यांना जायकवाडीचे बॅकवॉटर सध्या वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ येथपर्यंत असून येणा-या पाण्यामुळे बॅकवॉटरचे अंतर वाढण्याची शक्यता नाही. केवळ एक ते तीन फुटांनी बॅकवॉटरच्या पाण्याची उंची वाढून दुष्काळग्रस्त गंगापूर तालुक्यातील गोदाकाठची वीस गावे व वैजापूर तालुक्यातील पंधरा गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी व अंदाजे पाचशे हेक्टर जास्तीच्या सिंचनासाठी पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

अपव्यय टाळण्यासाठी पाण्याचा वेग वाढवणे गरजेचे आहे. सध्या येणारे पाणी अतिशय कमी गतीने सोडण्यात येत असून ते झिरपत झिरपत येत असल्यामुळे त्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असून ७.८९ टीएमसी पाण्यापैकी निम्मेदेखील पाणी जायकवाडीमध्ये पोहोचण्याबद्दल साशंकता असून जास्तीत जास्त पाणी जायकवाडीमध्ये पोचण्यासाठी सध्या सहा हजार क्युसेकने सोडण्यात येणारे पाणी किमान पंधरा हजार क्युसेकने सोडल्यास जायकवाडीसाठी समाधानकारक पाणी मिळण्यास मदत होईल, अशी माहिती जायकवाडीतील निवृत्त अधिका-याने दिली.