आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांच्या साथीने लढणार - डॉ. हमीद दाभोलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येनंतरच्या भावनिक लढाईवरच लढून चालणार नाही तर दाभोलकरांच्या विचारांचे मारेकरी जिवंत असल्याने निर्धारपूर्वक ही लढाई विवेकवादाने लढावी लागेल. यासाठी कृतिशील युवकांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग अध्यासन केंद्रातर्फे डॉ. हमीद दाभोलकर यांचा मुक्त संवाद व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ.सुधाकर शेंडगे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ.सुधीर गव्हाणे, डॉ. शहाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. हमीद म्हणाले, नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर राज्यभरात लोक रस्त्यावर आले. यात तरुणांचा मोठा सहभाग होता. प्रतिगामी विचारांविरुद्धचा हा लढा न संपणारा आहे. याच मंडळींनी गांधीजींचा खून केला होता. जादूटोणाविरोधी वटहुकुमाचे जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही, तोपर्यंत हा लढा आपण सर्वजण लढूया, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

विवेकवादाचा वसा आयुष्यभर पाळा, अशी शपथ या वेळी तरुणांना देण्यात आली. या वेळी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनीही युवकांना मार्गदश्रन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुधाकर शेंडगे यांनी केले. डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी विद्यार्थी, प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.