औरंगाबाद - ऑडिओमीटर, टीमप्यानोमीटर आणि बेरा मशीन अशी अतिशय महत्त्वाची तीन उपकरणे घाटीच्या कान, नाक, घसा विभागात बसविण्यात आली. ४० लाख खर्च करून तयार करण्यात आलेल्या ऑडिओलॉजी क्लिनिकचे बुधवारी अधिष्ठाता के. एस. भोपळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या क्लिनिकमुळे कान, नाक घशाचे अपंगत्व प्रमाणपत्र मिळणे अधिक सोपे आणि तत्काळ होणार आहे.
प्युटरटोन ऑडिओमीटर या यंत्रामुळे कानाचा पडदा फाटल्याने किंवा ऐकण्याचे हाड खराब झाल्याने येणाऱ्या बहिरेपणाची चाचणी करता येते. कर्णबधिर अपंगत्व टक्केवारी अचूकपणे निदर्शनास येण्यासाठी हे मशीन उपयुक्त आहे.
टीमप्यानोमीटरमध्ये मध्यकर्णात स्राव जमा होणे किंवा ऐकण्याची हाडे तुटल्याने येणाऱ्या बहिरेपणाचे निदान करता येते. तर बेरा (ब्रेन इव्होकड रिस्पॉन्स ऑडिओमीटर) यंत्राद्वारे आंतरकर्णातील ऐकण्याच्या मेंदूकडे जाणाऱ्या नसेच्या दोषामुळे येणारा बहिरेपणा व नवजात बालकाला लागणाऱ्या कृत्रिम कर्ण (कॉकलीअर इम्लांट) बसवण्यापूर्वी व नंतर होणाऱ्या कर्णबधिरतेच्या चाचण्या करता येतात.
अपंगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी वरील तिन्ही यंत्रातील चाचण्या गरजेच्या आहेत. विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी ३ वर्षांत ऑडिओलॉजी क्लिनिकची उभारणी करण्यासाठी पाठपुरावा केल्याने शेकडो रुग्णांसाठी उपयुक्त असे हे क्लिनिक अस्तित्वात आले. ऑडिओलॉजिस्टचे पद निर्माण करून मुंबई येथील डॉ. प्रिया गुप्ता यांना त्यांनी नियुक्त केले. डॉ. भोपळे यांना या विभागाचे महत्त्व पटवून देत अत्याधुनिक यंत्रसामग्री, ध्वनिविरहित वातानुकूलित रूम तयार करून घेत हा विभाग सुरू केला.'
एका छताखाली सर्व चाचण्या
या विभागाच्या उद्घाटनानंतर त्याची व्याप्ती आणि समाजाला होणारा फायदा लवकरच दिसू लागेल. अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवणे अधिक सोयीस्कर होईल. उपचारांसाठी बाहेरून कराव्या लागणाऱ्या चाचण्या एका छताखाली केल्या जातील. विभाग सुरळीतपणे चालविण्यासोबत शेकडो रुग्णांची सोय करण्यासाठी जे शक्य होते ते मी केले आहे. विभागात या सर्व बाबींची उपलब्धता करून देण्यासाठी सर्वांनी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी आभारी आहे, असे भावनोत्कट उद्गार विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी काढले.
"फुलों के रंग से दिल की...'
या विभागाच्या उद्घाटनानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात अधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांनी प्रेम पुजारी चित्रपटातील "फुलों के रंग से दिल की कलम से, तुझको लिखू रोज पाती' या गाण्याने सुरेल सादरीकरण करत उपस्थितांना अवाक् केले. कान, नाक घसा विभागातील कार्यक्रमाला या सुरेल स्वरांनी स्वरसाज चढला. शासकीय आणि वैद्यकीय सेवेत असतानाही गाण्यांची त्यांनी जपलेली आवड त्यांच्यातील दिलखुलास कलावंतांला जिवंत ठेवणारी ठरली. यावेळी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.