आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअपंगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना सुविधा देणे अपेक्षित आहे. प्रवासादरम्यान तर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र, डीबी स्टार चमूने पाहणी केली असता तसे काहीही आढळले नाही. अपंगांचा डबा कोठे लागणार आहे, याची माहिती स्थानकावरील चौकशी कक्षातून दिली जात नाही. व्हीलचेअर मोफत आहेत, पण हमाल त्याद्वारे डब्यापर्यंत सोडवण्याचे 80 रुपये भाडे घेतात. तसेच तिकिटात मिळणारी 75 टक्के सवलतही त्यांना बर्याच वेळा मिळत नाही, तर तांत्रिक कारणामुळे अनेकदा अपंगांचा डबा लावला जात नाही. याची माहितीही दिली जात नाही.
माहितीचा अभाव
अपंगांचा डबा गाडीच्या अगदी शेवटी असतो. त्याआधी लगेज बोगी असते. डबा शेवटी असल्यामुळे तिथपर्यंत जाण्यासाठी अपंगांना त्रास सहन करावा लागतो. डीबी स्टार चमू स्थानकावर असताना मनमाड-धर्माबाद एक्स्प्रेसला अपंगांचा डबा शेवटी लावण्यात आला होता, मात्र अपंग प्रवाशांना याची माहिती नव्हती. स्थानकावर गाडी आल्यावर डब्यांच्या स्थितीची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे दिली जात नाही. त्यामुळे अपंगांच्या डब्याची जागा बदलावी. त्याची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे आणि बोर्डवर द्यावी. डबा जोडला नसेल तर त्याची माहिती जाहीर करावी, आदी मागण्या अपंग प्रवाशांनी केल्या आहेत.
अपुर्या, नादुरुस्त व्हील चेअर
औरंगाबाद ते मनमाड तसेच औरंगाबाद ते नांदेड या दरम्यान रेल्वेंमध्ये औरंगाबाहून प्रवास करणार्यांची संख्या खूप आहे. यात अपंग व्यक्तींचाही मोठय़ा संख्येने समावेश असतो. तरीही औरंगाबाद स्थानकावर फक्त चार व्हीलचेअर आहेत. यापेक्षा जास्त अपंग आले तर त्यांना व्हीलचेअरची वाट पाहावी लागते. त्यातच चेअर मोडकळीला आल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले. तालुक्यात रेल्वेस्थानकावर तर फक्त एक किंवा दोन व्हीलचेअर आहेत. त्याही मोडकळीला आल्याचे रेल्वे विभागातील सूत्रांनी सांगितले. एका फलाटावरून दुसर्या फलाटावर जाताना स्थानकाच्या टोकाला असलेल्या दादर्यावरून व्हीलचेअरने जावे लागते. यामध्येही बराच वेळ वाया जातो.
अपंग ललिताची फरपट
ललिता अशोक मगर ही 18 वर्षांची विद्यार्थिनी अपंग आहे. ती शरीराने विकलांग तर आहेच, पण 90 टक्के कर्णबधिरही आहे. वडील अशोक मगर यांच्यासोबत शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी ती गेली होती. दोघेही पहाटे पाच वाजता वाळूजहून औरंगाबाद स्थानकावर आले. त्यांना काकीनाडा एक्स्प्रेसचे तिकीट मिळाले, पण त्यात त्यांना कोणतीच सवलत देण्यात आली नाही. कारण या एक्स्प्रेसमध्ये अपंगांचा डबाच नव्हता. शिर्डीवरून येताना मात्र तिकिटात त्यांना सवलत मिळाली. जाताना आणि येतानाची दोन्ही तिकिटे घेऊन मगर यांनी औरंगाबाद स्थानकावर तक्रार केली. मात्र, दखल कुणीच घेतली नाही. त्यांना आणखी एक अनुभव मनमाडच्या प्रवासादरम्यान आला होता. गाडीला अपंगांचा डबा जोडण्यात आला नव्हता.
अपंगांना सापत्न वागणूक
माझी मुलगी अनेक वेळा रेल्वेने प्रवास करते. अपंगांना सरकारने तिकिटात सवलत दिली असली तरी त्यांना रेल्वेस्थानकावर सापत्न वागणूक दिली जाते. चौकशी कक्षातील कर्मचारी उद्धटपणे बोलतात. शिवाय डबा आहे की नाही हेसुद्धा सांगत नाहीत. अनेकदा माझ्या मुलीला फुल तिकीट काढावे लागले. तक्रार केल्यावरही त्याची दखल घेतली जात नाही.- अशोक मगर,अपंग मुलीचे वडील
हा तर कायद्याचा भंग
अपंगांसाठी 1995 मध्ये सुधारित कायदा करण्यात आला आहे, पण त्याचे पालन होत नाही. कारण रेल्वेस्थानकावर कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. आम्ही दीड वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाला पत्रच दिले होते. त्यात अपंग विद्यार्थ्यांसाठी प्लॅटफार्म ओलांडण्यासाठी वेगळा मार्ग, कँटीन, टॉयलेट येथे वेगळी सुविधा असावी, ज्यादा व्हीलचेअर द्याव्यात, अशा मागण्या केल्या होत्या; पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. - उषा महाजन, कार्यकर्त्या, अपंग व अपंग पालक संघर्ष संघ
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.