आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाने जरी अपंग, आत्मविश्वासावर उभा मी; शासकीय योजनेशिवायही जगणाऱ्या जिद्दीला सलाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- मी पायाने जरी अपंग असलो तरी माझ्या आत्मविश्वासावर उभा असून शासनाच्या योजना मिळाव्यात व त्यातून प्रगती करावी यासाठी मी एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले. नोकरीसाठी शासनाचे उंबरठे झिजवले; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर गावातच घरालगत शासनाची कोणतीही मदत न घेता स्वत:च्या हिमतीवर चहाच्या टपरीसह किराणा साहित्य विक्रीचे दुकान सुरू केले. दिवसाकाठी यातून सुमारे १०० ते १५० रुपयांचा नफा मिळतो. यातून आता पुढे अाणखी उत्पन्न वाढेल असा विश्वास असून त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे दोन्ही पायांनी अपंग असलेले सुदाम घोलप यांनी सांगितले. 

खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथील सुदाम घोलप हे दोन्ही पायांनी अपंग असून ते उच्चशिक्षित आहेत. शासकीय सेवेत नोकरीसाठी ते पात्र असताना केवळ वशिला किंवा इतर मार्ग अवलंबले नसल्याने ते शासकीय नोकरी मिळवू शकले नाहीत. असे असले तरी त्यांना स्वत:वर विश्वास असून याच आत्मविश्वासाच्या जाेरावर त्यांनी आपला चहा टपरीचा व्यवसाय सुरू केला आहे. 

अपंग असूनही कोणतीही शासनाची मदत न घेता आज ते स्वयंस्फूर्तीने जीवन जगत आहेत. अशी परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे. आजमितीस तालुक्यात सुमारे दोनशेवर अपंग असून यात महिला व मुलींची संख्या अधिक आहे. यातील अनेकांची अद्यापपर्यंत शासन दरबारी नोंद नसल्याने त्यांना अपंगाचे कोणतेही लाभ मिळत नाहीत. परंतु आजही हे सर्व दिव्यांग स्वत:ची जिद्द व मेहनतीसह कुटुंबीयांच्या आधाराने जीवनाचे विविध टप्पे पार करत असल्याचे चित्र खुलताबाद तालुक्यात आहे.  

हे आहेत नोंदी नसलेले अपंग
- सविताबाई काळे (४५, रा. ताजनापूर)
- नसरीन मुन्शी सय्यद (३०, रा. देवळाणा)
- सरला लक्ष्मण चव्हाण (२३, रा. गोळेगाव)
- कांताबाई चव्हाण (५०, रा. खिर्डी)
- रंजना सर्जेराव अधाने (२४, रा. गदाना)
- लक्ष्मीबाई भागवान हिवर्डे (६८, रा. खिर्डी)
- पुंडलिक तातेराव काळे (५५, रा. ताजनापूर)
- सोमिनाथ जाधव (३०, रा. कानडगाव)
- अशोक सोमिनाथ चव्हाण (१९, रा. गदाना)
- शेख गनी शेख पाशा (५०, रा. कागजीपुरा) 

यांच्यासह तालुक्यातील अनेक अपंगांचे दोन्ही पाय, तर काहींचा एक पाय निकामी आहे. परंतु या अपंगांची शासनदरबारी नोंद नाही. “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने शोधलेल्या यापैकी काही अपंगांची नावे ग्रामपंचायतीत समाविष्ट असून लाभासाठी आवश्यक पंचायत समितीत मात्र यांच्या नोंदी नाहीत.

पाच वर्षांपासून शासनदरबारी खेटेच  
खुलताबाद तालुक्यातील देवळाना येथील अपंग युसूफ पटेल हे २०१२ पासून तालुक्यासह जिल्हा पातळीवरील शासन दरबारी विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खेटा मारत आहेत. पाच वर्षांत त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे अपंग युसूफ पटेल यांनी सांगितले त्यांच्या म्हणण्यानुसार बीजभांडवल योजनेसह वित्त महामंडळ योजनेतून मिळणाऱ्या कर्जासाठी त्यांनी प्रत्येक वर्षी खेट्या मारल्या परंतू उपयोग झाला नाही. आता युसूफ यांनी शासकीय कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी खेटा मारणे बंद केले आहे.   

ग्रामसेवकांना कराव्या लागतात नोंदी  
तालुक्यातील अपंगांच्या नोंदी संबंधित ग्रामसेवक करत असतो. ज्या त्या गावात ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवक कोणीही अपंग असल्यास याची नोंद घेण्यासाठी ग्रामस्थांना सूचना देत असतो. गावातील अपंगांना सूचनेची माहिती मिळाल्यावर अपंगाने ग्रामसेवकासी संपर्क करावे किंवा ग्रामसेवकाने अपंगाच्या घरी जाऊन अपंगाची नोंद करावी अपंगाची नोंद संबंधित ग्रामपंचायतीत घ्यावी. परंतु  पंचायत समितीत अपंगांच्या नोंदी घेण्याविषयी कोणतेही परिपत्रक नसल्याची माहिती सहायक प्रशासन अधिकारी चंद्रभान बनसोड यांनी दिली.

तत्काळ दखल घ्यावी 
अपंगांच्या संपूर्ण नोंदी घेतल्या गेल्या पाहिजेत, जर कुठलाही अपंग योजनेपासून लाभार्थी वंचित राहत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेतली पाहिजे. अन्यथा आम्ही अधिकाऱ्यांना धडा शिकवू. 
- आमदार बच्चू कडू, प्रहार अपंग संघटना

दिव्यांगांसाठी योजना
दिव्यांगांना व्यवसाय उभारणीसाठी बीज भांडवल योजना असून यात दीड लाखापर्यंत नाममात्र व्याजावर कर्ज दिले जाते. अपंग वित्त महामंडळ योजना केंद्रशासनामार्फत योजना राबवली जाते, याची मर्यादा अपंगाच्या व्यवसायावर अवलंबून आहे. विवाह प्रोत्साहन योजनेतून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. यात एक अपंग तर एक जोडीदार सक्षम असला पाहिजे. यासह विविध १०० वर दिव्यांगांसाठी लाभाच्या योजना शासनस्तरावर आहेत.  त्यासाठी अपंगाचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...