आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्‍ये हनुमान जयंतीचा उत्‍साह; सुंदरकांड आणि हनुमान चालीसा, रामरक्षेचे पठण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपारी हनुमान मंदिराची आकर्षक सजावट करण्यात अाली. - Divya Marathi
सुपारी हनुमान मंदिराची आकर्षक सजावट करण्यात अाली.
औरंगाबाद - मंगळवार आणि हनुमान जयंती असा अपूर्व योग अनेक वर्षांनी आल्याने शहरात हनुमान जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. शहरातील सुमारे पाचशे मंदिरांत पहाटे सहा वाजता जन्मोत्सव साजरा झाला. शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या सुपारी मारुती मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती. “श्रीगुरुचरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि...! ‘म्हणत हनुमान चालीसा, सुंदरकांड तसेच रामरक्षेचे पठण करण्यात आले. अनेक मंदिरांत खिचडी आणि बुंदीचा प्रसादाचे वाटप करण्यात आला.
 
मंगळवार हा मारुतीचा जन्मदिवस मानला जातो. यंदा हनुमान जयंती मंगळवारी आल्याने हनुमान भक्तांमध्ये उत्साह होता. या योगावार शेकडो भक्तांनी मंदिरात जाऊन अनुष्ठान केले. सुपारी मारुती मंदिराला चहुबाजूंनी रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासून रात्री बारापर्यंत मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. औरंगपुऱ्यातील चितलांगे दक्षिणमुखी हनुमान मंदिर, बांबू गल्लीजवळील जबरे हनुमान, रोकडा हनुमान कॉलनीतील दक्षिणमुखी हनुमान, कोटला कॉलनीजवळील समता दर्शन येथील जागृत हनुमान मंदिर, पानदरिबा येथील जागृत हनुमान मंदिर, हनुमान टेकडी या मंदिरांत भाविकांची गर्दी होती.
 
पानदरिबा मंदिरामध्ये सुंदरकांडाचे पठण
पानदरिबा येथील जागृत हनुमान या पुरातन मंदिरात सकाळी ६ वाजता  मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अकरा भाविकांनी सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. सायंकाळी दिल्ली येथील सरिता जोशी यांनी सुंदरकांडावर प्रवचन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मिथुन व्यास यांनी केले होते.
 
महिलांचा मोठा सहभाग
सुंदरकांडाच्या पठणात यंदा महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.अनेक मंदिरांत सामूहिक सुंदरकांडाचे पठण करण्यात महिला आघाडीवर होत्या. सुपारी मारुती मंदिरात मंगळवारपासून आठ दिवस हनुमान जयंतीचा उत्सव सुरू झाला. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...