आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी रांगा, भाविकांचा "भद्रा हनुमान की जय.... बजरंग बली की जय' असा जयघोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - "भद्रा हनुमान की जय.... बजरंग बली की जय' असा जयघोष करणाऱ्या भाविकांनी शुक्रवारी सायंकाळीच दर्शनासाठी भद्रा मारुती मंदिरात रांगा लावल्या. हनुमान जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी खुलताबादेत दाखल झालेल्या भाविकांच्या या
जयघोषामुळे शहरासह औरंगाबाद महामार्ग दणाणून गेला.

खुलताबाद शहरात शुक्रवारीच हजारो भाविक दाखल झाले असून भद्रा मारुती संस्थानच्या वतीने भाविकांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. भाविकांची संख्या पाहता कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, फुलंब्री मार्गासह विविध ठिकाणांहून पायी येणारे भाविक खुलताबाद शहरात दाखल होत होते. दिवस मावळताच भाविकांचे लोंढे भद्रा मारुती मंदिराकडे येत होते.
विशेषत: औरंगाबाद शहरातून पायी येणाऱ्या भाविकांमुळे औरंगाबाद-खुलताबाद महामार्ग गजबजून गेला. रात्री बारानंतर भाविकांची संख्या वाढल्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या. शनिवारी पहाटे चार वाजता महाभिषेक होणार असून खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे यांच्या हस्ते पहाटे सव्वापाच वाजता महाआरती होणार आहे. भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष काशीनाथ पाटील बारगळ, सचिव कचरू बारगळ, मिठ्ठू बारगळ, लक्ष्मण वर्पे, किशोर अग्रवाल उपस्थित राहणार आहेत.
वाहनांचा मार्ग बदलला

अौरंगाबाद रस्त्यावरून पायी येणाऱ्या लाखो भाविकांना अडचणी येऊ नयेत यासाठी जड वाहनांचा मार्ग बदलण्यात आला आहे. औरंगाबाद मार्गाकडून कन्नडकडे जाणारी जड वाहने शरणापूर येथून कसाबखेडा फाटामार्गे वेरूळहून कन्नडला जातील. कन्नडकडून येणारी वाहने वेरूळ येथील भोसले चौकातून कसाबखेडा फाटामार्गे शरणापूर येथून अौरंगाबादकडे जातील. हा बदल शुक्रवारी रात्रीपासून शनिवारच्या पूर्ण दिवसाकरिता करण्यात आला आहे.
पोलिसांचा बंदोबस्त

भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. पोलिस उपअधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० पोलिस अधिकारी, १०० पोलिस कर्मचारी, २० महिला पोलिस, ५० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत, असे खुलताबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी सांगितले. संस्थानच्या वतीनेही ५० जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.