आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हापूस, लालबाग दाखल; आमरसाच्या पर्वणीला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील बाजारपेठेत कर्नाटकी हापूस, लालबाग आणि आंध्र प्रदेशातील बदाम आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. हापूस २३० ते २५० रुपये, बदाम आणि लालबाग १०० ते १५० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. दक्षिण भारतातील आंबा आपल्याकडे लवकर दाखल झाल्याने आमरसाच्या पर्वणीला सुरुवात झाली आहे.

सध्या मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने आंब्यांचे भाव थोडे जास्तच आहेत. तरीही खरेदीला वेग आला आहे. यंदा आंब्याला विक्रमी मोहर लागला होता. त्यामुळे आंब्याचे उत्पादन चांगले येईल, असा अंदाज होता. पण अवकाळी पाऊस, गारपीट झाली. बरेच दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे आंब्यांचा ५० टक्क्यांपेक्षा जास्त मोहर गळून पडल्याने उत्पादनात घट येणार आहे.

असा ओळखा खरा हापूस
रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्यांच्या नावाखाली आंध्र प्रदेशातील विजयवाडा आणि कर्नाटकमधील हापूस आंबा ग्राहकांना दिला जाताे. देवगडच्या हापूस आंब्याला जास्त मागणी व भाव चांगला मिळतो. त्यामुळे असे प्रकार होतात. त्यासाठी ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी आंबा पारखूनच घ्यावा.

असा ओळखा हापूस
वजन : २५० ग्रॅमपर्यंत, मनमोहक सुगंध,
रंग : फिकट पिवळा,
आकार : देठाच्या दोन्ही बाजूंना गोल व निमुळता,
गर : शेंदरी रंगाचा व घट्ट असतो.

आरोग्य सांभाळा
कॅल्शियम कार्बाइडमध्ये पिकवलेला आंबा आतून पूर्ण पिकलेला नसतो पण आकर्षक दिसतो. तर नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे आकर्षक नसतात. त्यावर बारीक सुरकुत्या पडलेल्या असतात. हाताने दाबले तर तो नरम लागतो. कॅल्शियम कार्बाइड आरोग्यासाठी घातक असतात.