आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haribhau Bagade News In Marathi, BJP, Devendra Phadanvis, Divya Marathi

हर‍िभाऊ बागडे यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती, नाराजी दूर करण्‍याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांना बुधवारी शहरात पाठवून हा निर्णय कळवला आहे. भुसारी मुंबईहून शहरात दाखल झाले. त्यांच्यासमवेत जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार रावसाहेब दानवे होते. दोघे बागडे यांच्या उस्मानपुरा येथील निवासस्थानी गेले व त्यांनी प्रदेशाध्यक्षांनी दिलेले नियुक्तीचे पत्र बागडेंना प्रदान केले.
जालना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या बागडेंनी प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भाजप श्रेष्ठींनी गांभीर्याने घेत रिक्त असलेल्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली. सोलापूरचे माजी खासदार सुभाष देशमुख यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांचे पुत्र रोहन देशमुख यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केल्याने सुभाष देशमुख यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे.
उपाध्यक्षपदात दडलंय काय?
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांना प्रदेश उपाध्यक्षपद देऊन पक्ष नेतृत्वाने संभाव्य धोका टाळला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जालना मतदारसंघात नमनालाच अपशकुन होऊ नये, यासाठी पक्षश्रेष्ठींनी बागडेंच्या नाराजीला गांभीर्याने घेतले.
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे व बागडे यांच्यात उमेदवारीवरून निर्माण झालेले संकट टाळण्यात पक्षाला यश मिळाले आहे. बागडे यांनी राजकीय जीवनात पहिल्यांदाच नाराजीचा सूर आळवला होता. निवडणूक जिंकण्यासाठी खा. दानवे यांनी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना अव्वाच्या सव्वा आश्वासने दिली. फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यासह जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त पदाधिकार्‍यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या भूमिकेसाठी पद
पक्षश्रेष्ठींनी आपणास यापूर्वी थांबायला सांगितल्यामुळे आपण प्रचारापासून अलिप्त राहण्याचे धोरण अवलंबले होते. गावागावांतून कार्यकर्ते आपणास विचारत असल्याचे बागडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. प्रचारात आपण सक्रिय व्हावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी मागणी होती. पक्षश्रेष्ठींनी नव्याने जबाबदारी दिल्याने आपण प्रदेश उपाध्यक्षपदास योग्य न्याय देऊ. यापूर्वी 2009-10 मध्ये प्रदेश उपाध्यक्षपदावर काम केले असल्याचे बागडेंनी सांगितले.
प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने राज्यातील उमेदवार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते. विधानसभेच्या राज्यातील इतर जागांबद्दल जरी निर्णय घेता आला नाही तरी फुलंब्री विधानसभा मतदारसंघासंबंधीच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत आता बागडेंना डावलता येणार नाही. या उमेदवारीसंबंधी बागडे आपले म्हणणे लावून धरू शकतील, किंबहुना उमेदवार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.