आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिभाऊ बागडे यांची राज्यपालपदी नियुक्तीच्या हालचाली !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांची लवकरच राज्यपालपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येते. तत्त्वनिष्ठ बागडे राज्यपाल होणार या चर्चेने त्यांचे समर्थक तसेच फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अन्य इच्छुकही सुखावले आहेत. मात्र, स्वत: बागडे यांनी ही चर्चा म्हणजे अफवा असल्याचे म्हटले असले तरी कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर निवडणूक लढवेन; अन्यथा पक्ष म्हणेल ती जबाबदारी सांभाळेन, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यांचे राज्यपाल बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते राम नाईक यांची नुकतीच उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यापाठोपाठ पक्षात ज्येष्ठ असलेले बागडे यांनाही अशीच जबाबदारी दिली जाणार असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे. तसे झाल्यास औरंगाबाद जिल्ह्यातून राज्यपाल होणारे ते पहिले नेते ठरतील. यापूर्वी 1991 मध्ये पद्मविभूषण स्व. गोविंदभाई श्रॉफ यांना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, मराठवाड्याचे प्रश्न सुटल्याशिवाय पद घेणार नाही, असे सांगून भार्इंनी ही ऑफर फेटाळली होती. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा किंवा मराठवाड्यातून अशी संधी कोणालाही मिळू शकली नाही. या निमित्ताने हा अनुशेष भरला जाऊ शकतो.
तीन वेळा आमदार आणि साडेचार वर्षे राज्यात मंत्री राहिलेले बागडे हे सलग दोन पराभवानंतरही फुलंब्रीतून लढण्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मोदी लाटेमुळे राज्यात युतीचे सरकार आले तर बागडेंचे मंत्रिपद निश्चित आहे. मात्र बागडे यांचे पक्षकार्य लक्षात घेता त्यांना राज्यपालपदी नियुक्ती करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा आणि तरुण कार्यकर्त्यासाठी फुलंब्री विधानसभेची जागा मोकळी करून द्यावी, अशी रणनीती पक्षाने ठरवली असल्याचे सांगण्यात येते. यामागे जालना जिल्ह्यातील नेते असल्याची चर्चा आहे.

मला वाटते ही निव्वळ अफवा आहे. माझ्या कानी असा काही प्रकार आलेला नाही की कोणी चर्चाही केली नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून मी निवडणुकीची तयारी करतोय. पण पक्ष म्हणेल ती जबाबदारी मला सांभाळावी लागेल. हरिभाऊ बागडे, ज्येष्ठ नेते, भाजप.