आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harshwardhan Jadhav Entry In Shiv Sena Change Political Equation

हर्षवर्धन जाधवांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दसर्‍याच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अखेर शिवसेनेत प्रवेश केला. जाधव यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कन्नड तालुक्यात आगामी काळात राजकीय समीकरणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते अपक्ष राहणार की इतर पक्षात प्रवेश करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र, जो पक्ष मतदारसंघाच्या विकासासाठी निधी देईल त्याच पक्षासोबत जाऊ, असा आमदार जाधव यांनी पवित्रा घेतला होता. त्यानुसार शिवसेनेने तालुक्याच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर जाधव यांनी दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला. आमदार जाधव यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कन्नड तालुका ढवळून निघणार असून आगामी काळात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

कन्नड तालुका हा काळी भुई, घाटमाथा आणि खान्देश पट्टा अशा भागात विभागलेला आहे. तालुक्यात मराठा समाजासह बंजारा, मुस्लिम, माळी, वंजारी, राजपूत, परदेशी आदी समाजातील नागरिकांची संख्या मोठी आहे. ब्राह्मण, वाणी, मारवाडी समाजाचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

जाधव यांच्या सेना प्रवेशामुळे सेनेचे माजी आमदार नामदेव पवार कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील नाराजाची मोट बांधून इतर पक्षातील राजकीयदृष्ट्या नाराज असलेल्यांना सोबत घेत ते नवीन गट तयार करून राजकीय खेळीस सुरुवात करतील, असे मत राजकीय समीक्षकांनी वर्तवले आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार जाधवांना पाचारण करून आपली बाजू भक्कम करत माजी आमदार नामदेव पवार यांना आव्हान निर्माण केले आहे.

पवारांनी काँग्रेसचा बालेकिल्ला तोडून कन्नड तालुक्यावर शिवसेनेचा भगवा फडकवला होता. सेनेचे संघटनही वाढवले. मात्र, खैरे यांनी जाधवांना सेनेत सामावून घेत त्याच तालुक्यात दोन आजी-माजी आमदारांत स्पर्धा निर्माण केली. तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता घाटमाथा, काळी भुई, खान्देश हे तीन भाग परिणामकारक ठरतात. आमदार जाधव यांचे घाटमाथ्यावर प्राबल्य असून माजी आमदार नामदेव पवार हेदेखील घाटमाथ्याचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यांचाही चांगला प्रभाव आहे.

आमदार जाधव शिवसेनेत गेल्याने त्यांनी नामदेव पवारांच्या रूपाने आपल्या मतांची विभागणी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय माजी आमदार नितीन पाटील हेदेखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. खासदार खैरे यांना कन्नड तालुक्यातून मिळणारे मताधिक्य नितीन पाटलांमुळे कमी होऊ शकते. मात्र, आमदार जाधवांच्या सेना प्रवेशामुळे ही पोकळी भरून निघू शकते.

त्यामुळे आमदार जाधवांच्या सेना प्रवेशामुळे तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकांत दोन्ही मातब्बरांचा कस लागणार असून राजकीय समीकरणाची उलथापालथ होणार असल्याने राजकीय तर्ककुतर्कांना उधाण येण्यास आत्तापासूनच सुरुवात झाली आहे.


कार्यकर्ता हीच माझी संपत्ती आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा, सल्लामसलत करून निर्णय घेतले जातील. कार्यकर्त्यांच्या मताप्रमाणे पुढील दिशा ठरवण्यात यईल. नामदेव पवार, माजी आमदार शिवसेना.