औरंगाबाद - दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2012 मध्ये पाऊस न झाल्याने दुष्काळाचा कटू अनुभव नागरिकांनी घेतला. त्यातच पालिकेकडून पाणीपुरवठा होत नसलेल्या भागांना याचा जास्तच फटका बसला. यंदा पाऊस लांबल्याने बोअर आटण्यास सुरुवात झाली असून हर्सूल आणि सातारा परिसर पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आहे. या भागातील एक लाखांवर नागरिकांमध्ये सध्या अस्वस्थता आहे.
सर्व काही बोअरवर अवलंबून असलेल्या या भागातील बोअर गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातच कोरडे पडले. मात्र, त्यानंतर जोरदार पाऊस झाला अन् सर्वांना उपाययोजनांचा विसर पडला. यंदा पाऊस लांबल्याने हर्सूल, सातार्यातील नागरिक चिंतेत आहेत. सातार्यात सद्य:स्थितीत 9 टँकर सुरू असून येथील सर्व स्रोत कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत.
तूर्तास शेजार्यांकडून पाणी उपलब्ध होत असले, तरी येत्या काही दिवसांत अन्य बोअरही याच मार्गाने गेले, तर पुन्हा टँकरमागे धावावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागात ज्यांच्या बोअरला पुरेसे पाणी आहे, अशी मंडळी आजही बेदरकारपणे पाण्याचा वापर करत आहेत.
हार्वेस्टिंगला दाखवला ठेंगा
गतवर्षी पाणीटंचाई झाल्यामुळे यंदा रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार, असा दावा काही मंडळी करत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी जमिनीत मुरवले जाईल, असे वाटत होते. मात्र, गतवर्षी जून महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली, तरी या भागातील 1 टक्के मालमत्ताधारकांनीही हार्वेस्टिंग केले नाही.
हर्सूल तलावावर भर
हर्सूल तलाव गाळ गाठतोय. बोअर आटणे सुरू झाले. चारशे फुटांपर्यंत येथे बोअर घेण्यात आले. तरीही काही ठिकाणी पाणी नाही. पालिकेकडून पाणीपुरवठा होणार्या भागात बोअर लवकर आटत नाहीत. येथे मात्र सर्व जण बोअरचाच वापर करत असल्यामुळे हर्सूलचे पाणी संपले की अवघड होते.
सातारा स्वत:चा स्रोत नाही
सातार्याला स्वत:चा स्रोत नाही. पाणीपुरवठा योजना तोकडी आहे. नव्याने झालेली वसाहत आपली आहे, असे ग्रामपंचायतीला कधी वाटलेच नाही. त्यामुळे नव्या वसाहतींसाठी योजना नाही. त्यामुळे ना नळ, ना तळे अशा परिस्थितीत नागरिक बोअरच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.
पाण्याचे महत्त्व कळले
रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचे होते, परंतु नंतर त्याचा विसर पडला. आता बोअर आटल्यानंतर चूक दुरुस्त झाली. या वेळी पावसाचे पाणी वाहू देणार नाही. पाण्याचे महत्त्व सर्वांना कळू लागले आहे; पण त्यासाठी काय करावे लागते, हे सर्वांना कळावे. -विशाल चव्हाण