आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिराच्या नृत्यानेे वेधले प्रेक्षकांचे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हर्सूलयेथील हरसिद्धी यात्रेत यंदा पशुप्रदर्शनासह घोडदौड, सुंदर, आकर्षक अश्व आणि त्यांच्या नृत्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या वेळी सारंगधर पानकडे यांच्या घोड्याने खाटेवरील मनोवेधक नृत्य केले, तर माजी आमदार शिवाजी पंडित यांच्या शेरूने आसमान झेप घेत मुजरा करून नृत्याने लोकांचे चांगलेच मनोरंजन केले. मुक्या जिवांच्या या कलाप्रकारांचे प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून कौतुक केले.
हरसिद्धी यात्रेत दरवर्षी केवळ पशुप्रदर्शन आयोजित केले जायचे. यंदा मात्र त्यांचे कलाप्रकार सादर करण्याचा निर्णय यात्रोत्सव कमिटीने घेतला होता. शुक्रवारी झालेल्या प्रदर्शनात औरंगाबाद, धुळे, शिवपूर, बर्दापूर, शेवगाव, अहमदनगर, गंगापूर येथील ३५ हून अधिक अश्वांनी भाग घेतला होता. या वेळी नृत्य स्पर्धा, घोड्यांची शर्यत चाल शर्यत घेण्यात आली. देवीच्या मंदिराजवळील आखाडा मैदानात सकाळी पशुप्रदर्शनास प्रारंभ झाला. त्यानंतर घोड्यांची नृत्य स्पर्धा घेण्यात आली. सुरुवातीला सिडकोतील विजय सरोदे यांच्या गौरी नावाच्या अश्वाने कला सादर केली. त्यानंतर मुख्तार पटेल यांच्या भुरा, सौरभ ब्रह्मपूरकर यांच्या बाजीराव आणि संदीप शेलार, प्रल्हाद गुंजाळ हर्सूल यांच्या गंगा नावाच्या अश्वाने नृत्य सादर केले. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक पूनम बमणे, विजय औताडे यांनी केले. यात्रा उत्सव समितीत शेख लाल पटेल, बाजार समिती सभापती संजय औताडे, संजय भगुरे, अनिस पटेल, बाबा पटेल, हरिदास हरणे, जावेद पटेल, अनिल कांबळे, महादू वाणी आदींचा समावेश आहे.

लव्हबर्डपासून फिलिस्तानच्या सानियन बोकडाचा सहभाग
यात्रेनिमित्त पशुप्रदर्शन घेण्यात आले होते. यात आफ्रिकेचे लव्ह बर्ड, लख्खे कबुतर, ससे, पोपट, कुत्रे, शहामृग, कबुतर, शेख लाल रसूल यांचा दोन फुटांचा काश्मिरी बोकूड, तर अजिज सत्तार पटेल यांच्या फिलिस्तानच्या सानियन जातीच्या चार फूट बोकडाने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर प्रदर्शनात इब्राहिम पटेल यांचा एक लाख रुपये किमतीच्या राजस्थानच्या जमनापरी बोकडासह तोतापरी, पतीरा जातीचा बोकूड बकऱ्यांचा समावेश होता. प्रदर्शनात कोंबड्यांनी थेट झुंजीला सुरुवात केली होती. स्वखुशीनेच या झुंजी झाल्या असल्या तरी नागरिकांनी मात्र याचा मनमुराद आनंद घेतला.

घोड्यांची शर्यत कबड्डीत क्षणाक्षणाला उत्सुकता
शुक्रवारी घोड्यांची शर्यत घेण्यात आली. यात घोड्यांनी भाग घेतला होता. यात काठियावाड, मारवाड, पंजाबी, पंजाबी काठियावाड अश्वांचा सहभाग होता. यात प्रथम बक्षीस सारंगधर पानकडे यांच्या हिरा अश्वाला, मुख्तार पटेल यांचा दुसरा, तर भाऊराव चव्हाण यांच्या अश्वाचा तिसरा क्रमांक आला. शर्यतीसाठी पाच हजारांवर लोकांची गर्दी होती. कबड्डी स्पर्धेच्याही वेळी घोड्यांच्या शर्यतीसारखी उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत होती.

पंजाबी काठियावाडी हिरा आिण शेरूने उमटवला ठसा
नृत्यस्पर्धेत दहाहून जास्त अश्वांनी भाग घेतला होता. यात गंगापूरच्या पानकडे यांच्या पंजाबी काठियावाडी जातीच्या हिरा शेवगाव येथील शिवाजी पंडित यांच्या पंजाबी जातीच्या शेरूने स्पर्धेत वेगळा ठसा उमटवला. सहा फुटांपेक्षा उंच आणि पाच फुटांपेक्षा लांब असलेल्या पानकडे यांच्या शुभ्र अश्वाने केवळ तीन बाय पाचच्या खाटेवर अप्रतिम नृत्य सादर केले. हिराचा देखणा अवतार, तर शेरूची आसमान झेप, हिराची दुडकी चाल ताल, तर शेरूने दोन्ही पाय वर करून केलेले नृत्य घातलेल्या मुजऱ्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. क्षणाक्षणाला टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांची बरसात होत होती. या दोन्ही अश्वांवर कदरदानांनी हजारो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला. हिराने संगमनेरमधील स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकावले होते. या यात्रेतही पहिल्या बक्षिसाचा मानकरी हिराच ठरला. पंडित यांच्या घोड्याने तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब मिळवला आहे. या यात्रेत मात्र त्याने द्वितीय क्रमांक पटकावला. देखण्या अश्वामध्ये रविकिरण चव्हाण, धुळे यांच्या सुलतान अश्वाने पहिला क्रमांक पटकावला.

अहमदनगरच्या शेवगाव येथील माजी मंत्री शिवाजी पंडित यांच्या शेरूने यात्रेकरूंचेे मनोरंजन केले.
खरे तर कोंबड्यांच्या झुंजीला बंदी आहे. पण केवळ यात्रेकरूंसाठी कोंबड्याची झुंज घेण्यात आली.
धुळे, बीड, परळी, शिवपूर औरंगाबाद येथील स्पर्धकांनी घोडदौड स्पर्धेत भाग घेतला. या चित्तथरारक क्षणाला प्रेक्षकांचा उत्साह वाढला होता.