आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Harsul Lake Water Decline, But Officers Not Serious

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हर्सूल तलाव आटतोय; मात्र अधिका-यांना गांभीर्यच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येत्या आठ ते पंधरा दिवसांत हर्सूल तलाव कोरडाठाक पडणार असून परिणामी शहरातील १४ वॉर्डातील सुमारे १ लाख लोकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या नागरिकांना पाणी कसे पुरवायचे याचे कोणतेच नियोजन औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे नसल्याने आज सुकाणू समितीच्या बैठकीत कंपनीच्या अधिका-यांना लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागले.

समांतर जलवाहिनीवरून प्रचंड बोंबाबोंब झाल्यावर मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत सुकाणू समितीच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. या समितीची आज महापौर कला ओझा यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

त्यात समांतरच्या अधिका-यांना पुन्हा रोषाला सामोरे जावे लागले. अत्यावश्यक पण छोटीशी कामेही कंपनी करत नसल्याचा राग व्यक्त करताना अफसरखान यांनी आरडाओरड करीत अधिका-यांच्या अंगावर कागद फेकले, तर हर्सूलच्या पाणीप्रश्नावरून उपमहापौर संजय जोशी अधिका-यांच्या अंगावर धावून गेले.

'हर्सूलचे पाणी किती वॉर्डांना जाते, हेच माहिती नाही'
आजची बैठक सुरू झाल्यावर उपमहापौर संजय जोशी यांनी हर्सूलच्या पाण्याचा विषय काढला. तलावातील पाणीसाठा संपत आला आहे. येत्या आठवडाभरातच तलावातून पाणी उपसणे बंद होऊ शकते. त्याच्या पर्यायी उपायाचे काय करत आहात, असा प्रश्न त्यांनी केला. तलावावरून किती वॉर्डांना पाणीपुरवठा होतो माहीत आहे का, असे उपमहापौरांनी विचारताच अधिका-यांनी चार पाच वॉर्डात होत असेल, असे उत्तर देताच जोशी भडकले. तुम्हाला काहीच माहीत नाही, तुमच्याकडे नियोजन नाही, १४ वॉर्डांना हर्सूलचे पाणी जाते. तुमचे नियोजन नसेल तर लोक गप्प बसणार नाहीत. त्यांना त्रास देऊ नका, असे त्यांनी ठणकावले. त्यावर आम्ही नागरिकांना पाणी देऊ, असे सांगत कंपनीच्या अधिका-यांनी वेळ मारून नेली. हर्सूल तलावातून पाच एमएलडी पाणी उपसले जाते. त्यातून जुन्या शहरातील १४ वॉर्डांना पाणी पुरवठा केला जातो. त्यांना टंचाई काळात जायकवाडीचे पाणी देणे क्रमप्राप्त असून त्यासाठी नियोजन करणेही आवश्यक आहे. तसे न झाल्यास उर्वरित शहराच्या पाण्यावरही परिणाम होणे अटळ आहे.

यांची होती उपस्थिती
आजच्या या बैठकीला महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, सभागृह नेता किशोर नागरे, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरें, विरोधी पक्ष नेता असद पटेल, शहर अभियंता सखाराम पानझडे यांची उपस्थिती होती.

कंपनीला नोटीस बजावली
शहराला नियमित पाणीपुरवठा करणे, टँकरचे नियोजन सुरळीत करणे, जायकवाडीत पाइपलाइनच्या कामाला विलंब यासह समांतरच्या कामात सुधारणा होत नसल्याने मनपाने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीला नोटीस दिली असून मनपाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा व कारभारात सुधारणा करा नसता कठोर कारवाई करावी लागेल असे या नोटिशीत म्हटले आहे.

डेडलाइन पाळणे अवघड ठरणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ फेब्रुवारीपासून पाइपलाईनचे काम सुरू करू असे कंपनीने सांगितले.पालकमंत्री रामदास कदम यांना कंपनीने तसा शब्द दिला असतानाही त्या कामाची तयारी सुरू असल्याचेही कोठे दिसत नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांची डेडलाइन कंपनी पाळू शकेल याची शाश्वतीच पदाधिका-यांना वाटत नाही.