आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सूलची गुंठेवारी प्लॉटिंग महापालिकेने उधळली, ग्रीन झोनवर तुकडे पाडून सुरू होता दिवाळी धमाका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हर्सूल गावातून पिसादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ५० हजार चौरस फुटांच्या जागेवर ५० प्लॉट पाडण्यात आले. त्यावर २० बाय ३० आकाराचे तुकडे पाडून 'दिवाळी धमाका' म्हणून त्याची विक्री सुरू करण्यात आली. प्रत्यक्षात जागा एकच परंतु जाहिरात मात्र आनंदनगर आणि जिजाऊनगर अशी करण्यात आलेली. म्हणजे अनधिकृत प्लॉटिंग करण्याबरोबरच गरिबांना फसवण्याचा संबंधितांचा इरादा होता. बुधवारी सकाळी पालिका पथकाने हा प्रकार उधळून लावला.

हर्सूल भागात अनधिकृत प्लॉटिंग करण्यात येत असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यांनी प्लॉटिंगचे पॉम्प्लेट मिळवले असता एकाच जागेवर दोन नगर वसवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. जागा एकच, प्लॉट क्रमांकही सारखेच तरीही नगर मात्र दोन असा प्रकार समोर आला. एक तर अनधिकृत प्लॉटिंग करण्यात येत होती अन् दुसरे म्हणजे असे प्लॉट खरेदी करणाऱ्यांना ठरवून फसवण्यात येणार होत. त्यामुळे उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता एस. एस. कुलकर्णी, शाखा अभियंता के. बी. घुगे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांच्या पथकाने प्लॉटिंगच्या ठिकाणी धाव घेऊन भूखंडावर लावण्यात आलेले खांब, फलक उद्ध्वस्त केले.

ही जमीन शेतीच्या वापरासाठी आहे. तेथे अधिकृत प्लॉट पाडता येत नाही. तरीही तेथे अनधिकृत प्लॉटिंग करण्यात येत होती. ही जमीन कोणाच्या मालकीची आहे, तुकडे पाडून त्याची विक्री कोण करत होते, याची माहिती अजून पालिकेला मिळालेली नाही. आपली फसवणूक झाल्याची तक्रारही कोणी केली नसल्याने अद्यापि या प्रकरणात पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही.

दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी गुंठेवारीतील प्लॉट विक्री होत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडे पोहचली आहे. तशी तपासणी पथकाकडून केली जाणार आहे. परंतु अशी माहिती कोणाकडे असेल तर नागरिकांनी पालिकेकडे तक्रार करावी, माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, निवासी वापरासाठी भूखंड खरेदी करताना पालिका हद्दीत पालिकेची परवानगी असल्याशिवाय कोणीही असे व्यवहार करू नये, असे आवाहन पालिकेच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून एनए झाल्यानंतर महानगरपालिका लेआऊट मंजूर करते. त्यानंतरच घर बांधण्यासाठी असे भूखंड खरेदी करावेत. गुंठेवारीचे भूखंड अनधिकृत असतात. ते पालिका कधीही पाडू शकते. घरबांधणीसाठी त्यावर कर्जही मिळत नाही. त्यामुळे घरबांधणीसाठी भूखंड खरेदी करताना आधी महानगरपालिकेकडे शहानिशा करावी, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...