आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harsula Women Cooking March On Front Of Municipality

हर्सूलच्या महिलांचा महापालिकेवर हंडा मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -मनपाचे बेटरमेंट चार्जेस आणि इतर कर भरूनही गेल्या सात वर्षांपासून हर्सूल परिसरातील तीन वसाहतींना नळजोडणी नसल्याने आणि पाणी मिळत नसल्याने त्या भागातील 120 महिलांनी आज महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला. तरीही मनपाने ‘उद्या भेटून चर्चा करू’ असे आश्वासन देत त्यांची बोळवण केली.

हर्सूल परिसरातील व्यंकटेशनगर, म्हसोबानगर आणि साफल्यनगर या तीन वसाहतींचा पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मागील सात वर्षांपासून डझनभर निवेदने देऊन आणि नियमित कर भरूनही पाणी मिळत नसल्याने राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या नेतृत्वाखाली 120 महिलांनी आज मनपावर हंडा मोर्चा काढला. या महिलांना हंडे घेऊन मनपा इमारतीच्या आवारात प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांनी मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतापलेल्या काही महिलांनी दोन-तीन हंडे बंद गेटवरून आतही फेकले. नंतर आठ जणांच्या शिष्टमंडळाला आत सोडण्यात आले. या शिष्टमंडळाने आधी उपायुक्त रवींद्र निकम यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर निकम यांनी आयुक्तांशी चर्चा करून या शिष्टमंडळाला उद्या बैठकीसाठी बोलावले. या शिष्टमंडळाने नंतर शहर अभियंता सखाराम पानझडे यांनाही निवेदन दिले.
यानंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना औताडे म्हणाले की, या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आठ दिवसांत न सुटल्यास रास्ता रोको आंदोलन केले जाईल. कारण आतापर्यंत मनपाचा अनुभव फारसा चांगला नाही. 2006 पासून या भागातील नागरिक पाण्याची मागणी करीत आहेत. 500 घरांना नळाने पाणी मिळाले पाहिजे, कारण गेल्या दहा वर्षांपासून हे नागरिक तेथे राहतात. त्यांनी मनपाचे बेटरमेंट चार्जेस आणि इतर कर नियमित भरलेले आहेत. अनधिकृत वस्त्यांना पाणी पुरवणा-या मनपाने खरे तर या प्रामाणिक करदात्यांना अग्रहक्काने पाणी द्यायला हवे.

या वर्षात 8 निवेदने
2006 पासून दरवर्षी दोन-तीन निवेदने दिली जातात. पण काहीच होत नाही. 2013 मध्ये तर तब्बल 8 निवेदने मनपाला देण्यात आली. पण त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने संतापलेल्या महिलांनी सोमवारी महानगरपालिका गाठली.