आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive :सांगलीतील बेकायदेशीर गर्भपातानंतर धडक तपासणी, 107 हॉस्पिटलमध्ये त्रुटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातही धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या तपासणीमध्ये थेट बेकायदेशीर गर्भपाताला खतपाणी घालणारे प्रकार उघडकीस आले नसले तरी रुग्णालयांसाठी असलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. शहरातील २०, तर ग्रामीण भागातील तब्बल ८७ रुग्णालये नियम पाळत नसल्याची बाब या तपासणीमुळे उघडकीस आली असून आरोग्य विभागाने या रुग्णालयांना नोटिसाही पाठवल्या आहेत. 

शहर आणि ग्रामीण भागामध्ये १५ मार्चपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने धडक तपासणी मोहीम सुरू होती. या तपासणीसाठी शहरात दहा, तर ग्रामीण भागामध्ये सहा पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, पोलिस आणि महसूल विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. म्हैसाळ येथे बेकायदेशीर गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्या आदेशाने जिल्हाभरात तपासणी मोहीम सुरू झाली होती. लिंगचाचणी, बेकायदेशीर गर्भपाताबरोबरच रुग्णालयांसाठी असलेले नियम पाळले जातात की नाही, याचीही तपासणी या मोहिमेनिमित्त करण्यात आली. यामध्ये थेट लिंगचाचणी अथवा बेकायेदशीर गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले नसले तरी इतर गंभीर बाबी समोर आल्या आहेत. ज्यामध्ये संबंधित डॉक्टरांवर गुन्ह्यासह दंडात्मक कारवाईदेखील होऊ शकते. 

नियम मोडणाऱ्यांना नोटिसा 
ज्या रुग्णालयांनी नियम मोडले, अशांना मनपाच्या आरोग्य अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नोटिसा बजावून खुलासे मागवले आहेत. तसेच बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नसलेल्या रुग्णालयांची नावे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवण्यात आली अाहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक 
नियम मोडणाऱ्या रुग्णालयांसंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे बैठक होणार आहे. त्यात शहर ग्रामीणचे तपासणी अहवाल सादर होतील. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी सांगितले. 

काय आढळले तपासणीमध्ये? 
- सोनोग्राफी करण्यापूर्वी एफ फॉर्म भरणे, हा एफ फॉर्म अपूर्ण ठेवणे 
- एमआरआय, सीटी स्कॅन बी स्कॅन मशीन्सची पीसीपीएनडीटी अॅक्टअंतर्गत नोंदणी करणे 
- बेसमेंटमध्ये ओपीडी चालवणे, रुग्णालयांना पार्किंग नसणे 
- फायर सेफ्टी इक्विपमेंट नसणे 
- बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार दर तीन वर्षांनी परवाना नूतनीकरण करणे 
- बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट करणे, त्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी करणे 
- गर्भपाताचे कुठलेही अभिलेखे अद्ययावत ठेवणे
बातम्या आणखी आहेत...