आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकळ्या श्वासासाठी ‘तो’ तळमळला 48 तास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खेळता खेळता पेनचा मागचा तुकडा घशात आणि तेथून थेट श्वासनलिकेत गेला. त्याच क्षणापासून नऊवर्षीय मुलाची श्वास घेण्यासाठी तडफड सुरू झाली ती तब्बल दोन दिवस म्हणजे सतत 48 तास सुरू होती. आधी तळोदा, मग नंदुरबार, तिथून धुळ्याच्या शासकीय रुग्णालयातही उपचार झाले नाही म्हणून थेट घाटीत मोठा धोका पत्करून आणले. डॉक्टरांनी शर्थीने प्रयत्न केले आणि शस्त्रक्रियेनंतर मुलाने मोकळा श्वास घेतला.

समीर डोंगरे हा नऊ वर्षांचा मुलगा राणीपूर (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथील शासकीय आर्शमशाळेत तिसर्‍या वर्गात शिकतो. खेळता खेळता चुकून पेनचा मागचा तुकडा त्याच्या तोंडात गेला. काही कळायच्या आत तो थेट घशात व तेथून श्वासनलिकेत जाऊन अडकला. दुसर्‍या क्षणापासून समीरला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. श्वास घेताना वेगळाच आवाज येऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तळोदा येथील शासकीय कुटीर रुग्णालयात नेण्यात आले.

जुजबी उपचार करून त्याला नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. दुर्दैवाने तिथेही उपचार न होता त्याला धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, पुन्हा तेथेही अडचणींचा पाढा वाचून डॉक्टरांनी त्याला थेट घाटीत पाठवण्याचा सल्ला दिला. जसजसा वेळ जात होता तसतशी समीरची प्रकृती खालावत होती. त्याला श्वास घेण्यासाठी भयंकर त्रास होत होता. मध्येच कुठे कोसळतो की काय, अशी एकंदर परिस्थिती होती. मात्र, त्याही परिस्थितीत हिंमत न हरता त्याला घाटीत आणण्यात आले. मध्यरात्री बाराच्या सुमारास त्याला घाटीच्या अपघात विभागात आणले आणि पुढची चक्रे वेगाने फिरली. घाटीच्या डॉक्टरांनी प्रयत्नपूर्वक समीरचा जीव वाचवला, असे त्याला राणीपूरहून आणणारे शिक्षक भरत लिंबा चौधरी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

उशीर ठरला असता जीवघेणा
समीरला 15 मार्च रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास आणले आणि एकच्या सुमारास त्याच्यावरील शस्त्रक्रियेला सुरुवात झाली होती. त्याला जेव्हा घाटीत आणले तेव्हा त्याची अवस्था नाजूक होती. त्याच्या फुप्फुसांवर मोठा ताण आल्याने गंभीर परिणाम होण्याची भीती होती. कोणत्याही क्षणी फुप्फुसांचे कार्य थांबण्याचा धोका होता.

एकूणच शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन समीरचे शरीर निळे पडायला सुरुवात झाली होती. मेंदूला प्राणवायूचा पुरवठा कमी होण्याची शक्यता होती. निर्णायक वेळेला त्याच्यावर ‘ट्रकेस्टॉमी’ शस्त्रक्रिया करून श्वासनलिकेतील पेनचा तुकडा काढण्यात आला. मात्र, अजून उशीर झाला असता तर अघटित घडण्याची शक्यता होती, असे कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी सांगितले.

या शस्त्रक्रियेसाठी डॉ. वेदी यांच्यासह सहयोगी प्रा. डॉ र्शीनिवास चव्हाण, अधिव्याख्याता डॉ. वसंत पवार, निवासी डॉ. दीप्ती पुराणिक यांनीही शर्थ लढवली.
घाटीत यशस्वी शस्त्रक्रिया
नंदुरबार-धुळ्यात उपचार झाले नाहीत
आर्शमशाळेच्या मुलाने जिंकली लढाई
उपचार होणे आवश्यक होते
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा जिल्हा म्हणून नंदुरबार, धुळ्याची ओळख आहे. मात्र, त्यांच्याच जिल्ह्यात उपचारांची वानवा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. निदान धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात समीरवर तातडीने उपचार होणे आवश्यक होते. मात्र, तिथेही उपचार न झाल्याने मोठा धोका पत्करून त्याला घाटीमध्ये आणावे लागले.