आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थड्रिंकची गोडी, वाढवते जाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हेल्थड्रिंकने उंची लवकर वाढते, यातून मोठय़ा प्रमाणावर जीवनसत्त्व व प्रथिने मिळतात, असे दावे फोल ठरले असून, वाढत्या स्थूलपणाचे मुख्य कारण हे हेल्थड्रिंक्सच असल्याचे आहारतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पेयांतील साखरेचे प्रमाण शरीरास अपायकारक असून, त्यापेक्षा नैसर्गिक हेल्थड्रिंक पिण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

बाजारात उपलब्ध बहुतांशी हेल्थड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असते. पालकही मुलांना जीवनसत्त्व व प्रथिने देण्यासाठी दुधातून अशा प्रकारची पेये देतात. या प्रसंगी दुधात आणखी साखर टाकली जाते. यामुळे मुलांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून त्यांचे शरीर स्थूल होत असल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे. हेल्थड्रिंकमध्ये चॉकलेट फ्लेवरला अधिक मागणी आहे. परंतु यामुळे दुधातील कॅल्शिअम शरीराद्वारे व्यवस्थितरित्या शोषले जात नाही. हेल्थड्रिंक्समधील विविध घटकांमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. खेळाडू, भरपूर व्यायाम करणार्‍यांनीही नैसर्गिक हेल्थड्रिंक्स पिण्यावरच भर द्यावा, असा सल्ला निरामयच्या डॉ. अलका कर्णिक यांनी दिला आहे.

हे घटक ठरतात अपायकारक
कॅफीन : हेल्थड्रिंकमध्ये 20 ते 30 टक्क्यांपेक्षा अधिक कॅफीन असेल असे पेय घेणे आवर्जून टाळावे. कॅफीनमुळे शरीरात व्हिटॅमिन शोषले जात नाहीत, त्याचबरोबर चयापचय क्रियेत वाढ होते.

सोडियम कंटेन्ट : 100 एमएलमध्ये सहा ते आठ मिलिग्रॅम सोडियम कंटेन्ट असेल, तर वॉटर रिटेन्शन जास्त होते. उच्च् रक्तदाबाच्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. तसेच व्हिटॅमिन अँबसॉप्र्शन होत नाही.

साखर : आठ टक्क्याहून अधिक साखर असल्यास स्थूलत्व येते. तसेच दातांचे आरोग्य बिघडू शकते. कॅलरीज् वाढतात. ऊर्जेच्या समतोलामध्ये अडसर निर्माण होतो.

नैसर्गिक हेल्थड्रिंकची पाककृती
सूर्यफुलांच्या बिया, कलिंगडाच्या बिया, मीठ न लावलेले पिस्ता, बदाम प्रत्येकी 75 ग्रॅम घेऊन त्यात सुमारे 25 ग्रॅम खसखस आणि थोडेसे केशर यांची पावडर करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. रोज सुमारे 200 एमएल दुधामध्ये ही पावडर तीन चमचे घाला व त्याबरोबर दोन खजूर किंवा 15 ते 20 काळ्या मनुका किंवा दोन अंजीर खा. हवे तर दूध थंड करून त्यामध्ये मध घालून पिल्यास उत्तम. हे हेल्थड्रिंक बाराही महिने चालू शकते, असा सल्ला तज्ज्ञ देतात.


टीनमधील आमरस टाळा
टीनमधील आंब्याच्या रसामध्ये रासायनिक पदार्थ आणि साखरेचा अधिक वापर असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्नांनी असा रस खाणे टाळावे.