आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health News In Marathi, Primary Health Centre, Divya Marathi, Aurangabad

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन लावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या व्हेंडिंग मशीन लावण्याची सूचना जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला केली आहे. ‘यासाठी प्रस्ताव दाखल करा, आम्ही निधी उपलब्ध करून देऊ’ असेही कुमार यांनी स्पष्ट केले. ‘डीबी स्टार’ याविषयी सातत्याने पाठपुरावा करत आहे. दुसरीकडे महानगरपालिका यासाठी पुनर्निविदा बोलावणार आहे.

जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत येणा-या महिला सक्षमीकरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत ग्रामीण भाग फार मागे आहे. ही आकडेवारी 0.2 टक्के इतकी धक्कादायक आहे, तर दुसरीकडे शहरी भागात उपलब्धतेच्या अडचणींमुळे गरीब महिलांचा कल पारंपरिक पद्धतींकडेच आहे. मेडिकल दुकानांमध्ये मागणी करताना कुचंबना होते हेदेखील एक कारण आहे. याबाबत ‘डीबी स्टार’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर मनपा, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला. मनपाने प्रतिसाद दिला. त्यानंतर जिल्हाधिका-यांसोबत हिरकणी कक्ष उभारणी आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनबाबत चर्चा केली. त्यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर निवडणुकांची कामे आटोपल्यानंतर चमूने विक्रम कुमार यांंची पुन्हा भेट घेऊन विषयाची आठवण करून दिली. त्यांनी तत्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांना प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दिली.

डीपीडीसीमार्फत निधी
या विषयासाठी येत्या डीपीडीसी बैठकीत प्रस्ताव ठेवला जाणार आहे. जिल्ह्यात 50 पीएचसी आहेत. त्यातील 27 या इंडियन पब्लिक हेल्थच्या निकषांनुसार आहेत. त्यामुळे या 27 केंद्रांचा विचार केला जाणार आहे.

मनपा पुनर्निविदा बोलावणार
विषय प्रसिद्ध झाल्यावर सर्वप्रथम मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महिला व बालकल्याण विभागाला याबाबत सूचना दिल्या होत्या. विभागप्रमुख प्रेमलता कराड यांनी समितीपुढे सादरीकरण केल्यावर त्याला मंजुरी दिली. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली, मात्र अर्जदाराने आक्षेप घेतल्याने पुनर्निविदा बोलावल्या जाणार आहेत. त्यानंतर शहरात दोन टप्प्यांत 10 मशीन बसवण्यात येतील, असे कराड यांनी सांगितले.

महत्त्वाचा विषय
हा अत्यंत महत्त्वाचा विषय माझ्याकडे मांडण्यात आला. ग्रामीण भागात सहज आणि स्वस्त उपलब्धता आवश्यक आहे. त्यामुळे डीपीडीसीसमोर हा विषय ठेवून निधी दिला जाईल.
-विक्रम कुमार, जिल्हाधिकारी

लवकरच प्रस्ताव
जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार व्हेंडिंग मशीनबाबतचा प्रस्ताव सादर केला जाईल. विभागनिहाय सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएचसीमध्ये मशीन बसवण्यात येतील.
-डॉ. बी. टी. जमादार
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद