आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यू - आरोग्य पथक वाळूजमध्ये दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - डेंग्यू आजाराने बजाजनगर, पंढरपूरनंतर वाळूज गावात थैमान घातल्याचे वृत्त बुधवारी ‘दिव्य मराठी’ प्रकाशित केल्यानंतर आरोग्य विभाग जागा झाला आहे. जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ७ जणांच्या पथकाने वाळूजला धाव घेत बुधवारी दिवसभर विविध भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले. तसेच नागरिक आणि ग्रामपंचायत प्रशासनास कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले.

वाळूज गावातील अनेक भागात कचरा साचलेला आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरत आहे. तसेच ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यामुळे डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. ग्रामस्थांना ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीच्या व्याधीने ग्रासले आहे. गावातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी पांडवे, मलेरिया मुक्तता सुपरवायझर आर.एस.सासवडकर, एस.आर. भालेराव, आरोग्यसेविका ए.ए. बनकर, एम.एल. पवार, जे.डी. जक्कल, ए.ए. सय्यद, डी.वाय. बरबाहिले, ग्रामसेवक एन.के. वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद अग्रवाल, अंकुश गायकवाड यांचा समावेश होता.

प्रतिबंधात्मक उपाय
बजाजनगर या वसाहतीत डेंग्यूच्या आजाराने तिघांचा बळी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून बुधवारी सर्व्हे करण्यात आला. मूळ गाव, अण्णाभाऊ साठेनगर परिसरात हा सर्व्हे झाला. गावातील सद्य:स्थितीबाबत आरोग्य पथकाला ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद अग्रवाल यांनी सविस्तर माहिती दिली. आरोग्य पथकाने आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणे, त्यात भांडी कोरडी करणे, अबेट ट्रिटमेंट करणे आदी प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्या. ग्रामपंचायतीच्या वतीनेदेखील कोरडा दिवस पाळला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. पांडवे यांनी दिली.

कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिका-यांनी वाळूज गावाची पाहणी करत गावातील विविध भागांत साठवलेल्या सांडपाण्यात औषध टाकले. गावक-यांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही पथकाच्या वतीने करण्यात आले.