आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Health Technology: Treatment On Patients Through Video Conference

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य तंत्रज्ञान: 'व्हीसी'द्वारे रुग्णांवर उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मी सेलूमध्ये राहते. मला हायपर टेंशन आणि हृदयविकाराचा आजार होता. चार महिन्यांपूर्वी जालना येथील जिल्हा रुग्णालयातील टेलिमेडिसिन विभागामार्फत माझ्यावर औरंगाबादेतून उपचार सुरू करण्यात आले. डॉ. मंगला बोरकर यांनी माझ्यावर उपचार केले. अवघ्या तीन वेळा झालेल्या कॉन्फरन्सनंतर माझा आजार बरा झाला, अशी प्रतिक्रिया घाटीत गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेल्या टेलिमेडिसिन उपचारांबाबत एका महिला रुग्णाने दिली.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मराठवाड्यासोबतच इतर जिल्ह्यांतून रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णांना अनेक दुर्धर आणि विशेष आजार असतात. तेव्हा त्यांना सतत ये-जा करणे किंवा विशेषज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणे हे आर्थिकदृष्ट्या तसेच वेळेच्या दृष्टीने खार्चिक ठरते. यासाठी २००८ मध्ये सुरू झालेला टेलिमेडिसीन उपक्रम विशेष लाभदायी ठरल्याचे दिसून आले आहे. गेल्या ७ वर्षांमध्ये या विभागाच्या माध्यमातून १० हजार ८८५ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

औषधीशास्त्र विभाग, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, छातीचे आजार, क्षयरोग, एचआयव्ही- एड्स, सिकलसेल, रेडिओलॉजी, दातांचे विकार, बालरोग, स्त्रियांचे आजार, नाक-कान-घशाचे उपचार, न्यूरॉलॉजिकल, युरॉलॉजिकल, हृदयरोग एवढेच नाही तर मानसिक आजारही बरे करण्यात यश आले आहे. वैजापूर, गंगापूर, अंबड, उमरगा, हदगाव उपजिल्हा रुग्णालय, जालना आणि परभणी जिल्हा रुग्णालय तसेच बीड आणि उस्मानाबादेतील टेलिमेडिसीन केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना थेट औरंगाबादेतील तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, औषधोपचार शक्य झाले आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

नवीन औषध आणि उपचारांवर मार्गदर्शन
टेलिमेडिसिन विभागामार्फत रुग्णांना औषधोपचारांसोबतच इतरही उपक्रम राबवले जातात. वैद्यकीय क्षेत्रात नवनवे औषधोपचार, तंत्रज्ञान येत असते. त्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना देऊन रुग्णांना त्याचा कसा फायदा देता येईल याबाबतही मार्गदर्शन केले जाते. ऑनलाइन बैठकांच्या माध्यमातून काही आरोग्यविषयक प्रश्न सोडवले जातात, तर प्रशिक्षणही दिले जाते.

दिलासा देणारा उपक्रम
सात वर्षांत १० हजारांवर रुग्णांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून दिले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने यासाठीचे विशेष सॉफ्टवेअर तयार केले. ईसीजी, सोनोग्राफी तेथील यंत्रावर त्या केंद्रातील डॉक्टर करतात, ते येथे ऑनलाइन दिसते. त्यानुसार प्रत्येक विभागाचे डॉक्टर येथून मार्गदर्शन, औषधोपचार आणि पुढील दिशा सांगतात. यामुळे रुग्णांचा औरंगाबादेत येण्याचा खर्च वाचतो, वेळ वाचतो.
विशाल देशमुख, टेलिमेडिसिन विभाग व्यवस्थापक.