आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोगांवरही गुणकारी सोने!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय नवीन वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग गुरुवारी (18 एप्रिल) जुळून आला आहे. त्यातच सोनेही तब्बल चार हजारांनी गडगडले आहे. त्यामुळे या योगावर जोरदार सोने खरेदी सुरू झाली आहे. अलंकार म्हणून वापरल्या जाणार्‍या या सोन्याला आयुर्वेदातही मोठे महत्त्व आहे. विशेष म्हणजे कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह या रोगांवरही प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. सोने 100 पेक्षा अधिक रोगांवर गुणकारी असल्याचा संदर्भ अयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आहे.

आयुर्वेदातील ‘चरकसंहिता’ या ग्रंथामध्ये (इ.स.पूर्व 3000 ते 5000) 23 व्या अध्यायातील 239 व्या श्लोकात सुवर्णाचा उपयोग सर्वांत प्रथम सांगितला आहे. शरीरातील विष बाहेर टाकण्यासाठी सुवर्ण गुणकारी असल्याचे ग्रंथात म्हटले आहे. युद्धातील जखमांना जंतुसंसर्ग आणि दंशाचे परिणाम टाळण्यासाठी सोन्याची काडी मधासोबत उगाळून देण्याची पद्धत ‘चरकसंहिते’त सांगितली आहे, तर ‘सुर्शुतसंहिते’मध्ये 28 व्या अध्यायातील दहाव्या व अकराव्या श्लोकात बुद्धी, मेधा (ग्रहणशक्ती) व स्मृतीसाठी सुवर्ण गुणकारी असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे ‘गुरुपुष्य’ नक्षत्र हे शरीराचे पोषण करणारे नक्षत्र समजले जाते, म्हणूनच एक वर्ष प्रत्येक नक्षत्राला सुवर्णाचा उपयोग करावा. र्शीसूक्ताच्या पाठानंतर मध, तूप, बेलाच्या चुर्णासोबत सोन्याचे चुर्ण किंवा भस्माचा वापर करावा, असेही नमूद केले आहे. लहान मुलांच्या आजारांसंबंधी बांधलेल्या ‘काश्यप संहिते’त पहिल्याच ‘लेह अध्याया’मध्ये तर ‘सुवर्ण प्राशन संस्कार’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. यात लहान मुलांवर सहा पुष्यनक्षत्रे सुवर्ण प्राशन संस्कार करावेत, असे म्हटले आहे. यातही मेधा, अग्नी, बल, आयुष्य असे लाभ होत असल्याची ग्रंथात नोंद आहे. आयुर्वेदानुसार सुवर्ण हे चवीला गोड, थंड, शरीराचे पोषण करणारे, विशेष रसायन, त्रिदोषनाशक, विषहारक आहे, असे वैद्य संतोष नेवपूरकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

लहान मुलांसाठी उत्तम संस्कार

2011-12 मध्ये गुजरात सरकारने जामनगरमध्ये काही हजार मुलांवर सुवर्ण प्राशन संस्कार केले. यात वयानुसार विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या द्रव स्वरूपातील सुवर्णाचे एक किंवा काही थेंब दिल्यानंतर लक्षात आलेल्या अभ्यासात, रोगप्रतिकारशक्ती वाढते, सर्दी-खोकला-ताप यासारखे 70 टक्के सामान्य आजार कमी होतात, भूक वाढते, हायपर अँक्टिव्हिटी कमी होते आदी चांगले परिणाम दिसून आले आहे, असे वैद्य अनघा नेवपूरकर म्हणाल्या. त्याचप्रमाणे, अलीकडे विविध कर्करोग, त्वचारोग, आमवात यासारख्या आजारांवरही सोन्याचा वेगवेगळ्या औषधांसोबत केलेला वापर उपयुक्त ठरत असल्याचे वैद्य सोहन पाठक म्हणाले.

असा झाला ‘त्यांना’ फायदा

शहरातील 38 वर्षीय पुरुष व्यक्तीला गेल्या मार्चमध्ये जिभेचा कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. मे महिन्यापर्यंत शस्त्रक्रिया तसेच किमोथेरपी व रेडिएशनचे उपचार झाले. त्यानंतर सुवर्णाचे उपचार सुरू केले व उत्तम रिकव्हरी झाली. आता त्याचे सर्व रुटीन सुरू झाले आहे. कमी कालावधीत झालेल्या रिकव्हरीबद्दल ‘टाटा’च्या फॉलोअपमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. शहरातील अजून एका 62 वर्षीय पुरुष व्यक्तीला 16 वर्षांपासून मधुमेह आहे व पाच वर्षांपासून इन्सुलिन सुरू आहे. मात्र तीव्र मधुमेहामुळे ही व्यक्ती गलितगात्र झाली व त्यांना कुठलीही इच्छा राहिली नाही. त्यांचे घरातून बाहेर पडणेही थांबले. अशा परिस्थितीत त्यांच्यावर केवळ 10 दिवस सुवर्णाचे उपचार केले. आता त्यांचा कमकुवतपणा कमी झाला असून, सर्व रुटीन पूर्ववत सुरू झाले असल्याचे वैद्य नेवपूरकर म्हणाले.

आजच्या विकारांवर गुणकारी
हृदयविकार
‘हृद्द्य’ असा सुवर्णाचा उल्लेख करण्यात आला असून सोन्याच्या विशिष्ट स्वरूपातील सेवनामुळे हृदय मजबूत होते. 10-15 वर्षांपासून मधुमेह असल्याने किंवा वर्षानुवर्षाच्या रक्तदाबामुळे हृदय कमकुवत झाल्यास, मानसिक आघात सहन होत नसल्यास किंवा वार्धक्यामुळे हृदय कमकुवत झाल्यास
सोन्याचा निश्चित उपयोग होतो.

जुनाट त्वचाविकार
अनेक वर्षांच्या विविध उपचारांनंतरही प्रतिसाद मिळत नसल्यास सोरायसिस ते एक्झिमापर्यंतच्या विविध जुनाट त्वचा विकारांवर सुवर्ण उपयुक्त.

कॅन्सर
कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर तसेच रेडिएशन व किमोथेरपीच्या उपचारांनंतर गलितगात्र रुग्णाला सर्वार्थाने शक्ती देण्यासाठीही वेगळ्या पद्धतीने सुवर्णाचा उपयोग होतो.

नेत्रदोष
कमी वयातील चष्मा, नेत्रदोष किंवा मधुमेहामुळे निर्माण झालेल्या नेत्रविकारांवर सुवर्णाचा उपयोग सिद्ध झाला आहे. अर्थात, अशा रुग्णांमध्ये थेट सोने न देता, सोने पाण्यात उकळून कोरफडीला 21 दिवस घालायचे आणि ती कोरफड विशिष्ट पद्धतीने रुग्णास खाण्यास दिली जाते.

किडनीस्टोन,
संधिवात
मुतखड्यासाठी तसेच कामशक्ती वाढवण्यासाठी, शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठीही उपयुक्त. जुनाट संधिवातही कमी होत असल्याचे लक्षात आले आहे.