आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरावर धुक्याचे आच्छादन; पावसामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील चार दिवसांपासून हवामानात अनपेक्षित बदल होऊन पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी पहाटे ६ ते ८ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व सलीम अली सरोवर परिसर, हर्सूल, सावंगी, उस्मानपुरा आदी भागांत दाट धुक्याचे अाच्छादन पसरले होते. पहाटे जॉगिंग आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना काश्मीरची आठवण झाली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच धुके आल्याने आनंद व आश्चर्यही व्यक्त करण्यात आले. धुक्याची तीव्रता जास्त असल्याने हाकेच्या अंतरावर काहीच दिसत नव्हते. जिल्ह्यातील खुलताबाद, शुलीभंजन आणि सारोळा आदी ठिकाणी पावसाळ्यात दाट धुके असते. पण शहरात मात्र अचानक दाट धुके पाहुन आपण उत्तर भारतात आहोत की काय ? असा समज पहाटे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांचा झाला होता.

उस्मानपुऱ्यात १४ मिमी
गुरुवारी उस्मानपुऱ्यात सायंकाळी १४ मिमी. पावसाची नोंद झाली. तसेच भावसिंगपुरा ४, हर्सूल ६, चिकलठाणा ५.३, शहर परिसरातील चित्तेपिंपळगाव ३२, चौका ८, लाडसावंगी ३०, कांचनवाडी १६ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला. या वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ज्वारी आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आंब्याचा मोहर गळून पडला आहे.

गारपीट होणार?...
आंध्र प्रदेश, ओरिसा किनारपट्टीवर पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर वायुभार कमी झाला आहे. तसेच पूर्व मध्य व ईशान्य अरबी समुद्रात उत्तर कोकण आणि दक्षिण किनारपट्टीलगत समुद्र सपाटीपासून दीड ते दोन किलोमीटरवर चक्राकार वारे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ढगाळ वातावरण, दिवसाचे तापमान कमी व रात्रीच्या तापमानात वाढ होईल.
वायुभार कमी राहील. परिणामी पुढील तीन दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. नांदेड व परभणी जिल्ह्यात सौम्य स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण हवामानशास्त्र प्रकल्प विभागाचे मुख्य समन्वयक प्रल्हाद जायभाये यांनी व्यक्त केली.

श्वसनाचे विकार वाढतात
^ढगाळ वातावरण व धुक्यामुळे श्वसनाचे विकार जास्त बळावतात. व्हयरल इन्फेक्शन होऊन सर्दी, खोकला आणि ताप येतो. लहान मूल व ज्येष्ठ नागरिकांना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. धुक्याच्या वातावरणात बाहेर पडू नये, महत्त्वाचे काम असल्यास तोंडाला रूमाल बांधावा. ऊबदार कपडे घालावेत. डॉ. गणेश डोईफोडे, सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल