आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत अतिवृष्टी: 40 अवर्समध्ये 123.3 मिमी पाऊस, नाथसागरात पाण्याची आवक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात सुरू असलेल्या पावसामुळे औरंगाबाद लेणी परिसरातील डोंगरदऱ्यांतून पाणी खळाळून वाहत आहे. छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
शहरात सुरू असलेल्या पावसामुळे औरंगाबाद लेणी परिसरातील डोंगरदऱ्यांतून पाणी खळाळून वाहत आहे. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद - चांगल्या पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या तमाम ‘चातकां’ची पावसाने इच्छापूर्ती केली. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस गेल्या ४० तासांत पडला. मंगळवारी झालेल्या दमदार पावसानंतर (६७.७ मि.मी.) तीन दिवस काळ्याकुट्ट ढगांचे आच्छादन होते. मुसळधार पाऊस पडणार असेच वाटायचे. पण तिन्ही दिवस हुलकावणी मिळाली. मात्र शनिवारी पावसाने दमदार बॅटिंगला सुरुवात केली आणि ४० तासांत १२३.३ मि. मी. बरसला.

शनिवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत २९.७ मिमी, रात्री ८.३० ते रविवार सकाळी ८.३० वाजेपर्यंत १४.६ आणि रात्री ११.३० वाजेपर्यंत ७९.९ मिमी असा एकूण ४० तासांत १२३.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. सरीवर सरी कोसळत असल्याने संपूर्ण शहरभर पाणीच पाणी झाले आहे. गल्लीबोळांसह रस्ते, नाले ओसंडून वाहत आहेत. सखल भागात मोठी डबकी साचली आहेत. पावसामुळे जाफर गेट येथील आठवडी बाजार चिखलमय झाला. डांबरी रस्ते नसलेल्या भागात चालणे कठीण झाले. वाहनचालकांची चांगलीच त्रेधा उडाली. पण पावसाळी पर्यटन करणाऱ्यांनी मौज केली. जून महिन्यातील दोन आठवडे कोरडेच गेले. उर्वरित दोन आठवड्यांत ११८.२ मिमी पाऊस पडला.
5 जुलै रोजी सर्वत्र (६७.७. मिमी.) मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर तीन दिवस पुन्हा पावसाने हुलकावणी दिली. पण शनिवारी ४४.३ रविवारी ४३.९ मिमी असा दमदार झाला. 5,9 अणि 10 जुलै या तीन दिवसांत १५५.९ मिमी पाऊस पडण्याचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. खरीप पेरणी अंतिम टप्प्यात असून जमिनीत पाणी भरू लागल्याने हळूहळू जलस्रोतांत पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. विहिरी, बोअरवेल, शेततळी, जलयुक्त शिवार पाण्याने भरू लागले आहेत. यामुळे दुष्काळाचे मळभ हटून रान हिरवेगार दिसू लागल्याने आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात साचली तळी : चिकलठाणाते छावणी, सिडको ते हर्सूल, जाधववाडी, सेव्हन हिल्स ते सातारा देवळाई, रेल्वेस्टेशन, त्रिमूर्ती चौक, उस्मानपुरा, कटकट गेट, शहागंज, निराला बाजार, औरंगपुरा आदी ठिकाणच्या सखल भागात तळी साचली आहेत. राजनगर, गुंठेवारी भाग, सातारा-देवळाई भागात मातीचे रस्ते असल्याने या भागात तर ये-जा करणे कठीण झाले. मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचल्याने अनेक वाहनचालक घसरून पडले.

वृक्ष उन्मळून पडला : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे पावसात एक वृक्ष उन्मळून पडल्याची नोंद अग्निशमन दलाने घेतली आहे. तसेच अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

सजग राहून टाळा तोटे : सतत ढगाळ वातावरण पाऊस पडत राहिल्यास कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढून पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. जास्त दिवस पाणी साचले तर पीक शेतीचे नुकसान होते. दमट वातावरणामुळे सर्दी, डोकेदुखी, ताप, दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, हिवताप यासारखे आजार बळावण्याची शक्यता आहे. यासाठी उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका, जास्त वेळ ओले कपडे ठेवू नका, भाजीपाला स्वच्छ धुऊन खा, जास्त पिकलेली फळे सेवन करू नका, साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करा, असा सल्ला कृषी तसेच आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

जायकवाडीत सहा दलघमी पाण्याची आवक
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर-मधमेश्वरमधून १२,९०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीच्या पुराचे हे पाणी जायकवाडीत आल्यास पाणीसाठा वाढणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीत २३.४२ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. धरणात सध्या ४८९ दलघमी पाणीसाठा आहे. अजूनही पाणीपातळी मृतसाठ्यातच आहे. जायकवाडीच्या पाणीसाठ्यात आता वाढ व्हायला सुरुवात झाली आहे.
२४तासांत पाणी पोहोचणार : नाशिक जिल्ह्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीला पूर आला आहे. कडाकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदूर-मधमेश्वरमधून रविवारी रात्री6 ते 9 पर्यंत तीन हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले, तर रात्री साडेनऊ वा. विसर्ग वाढवण्यात आला . १२ हजार ९०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. नांदूर-मधमेश्वर ते जायकवाडी हे अंतर १२० किमी आहे. त्यामुळे हे पाणी पोहोचण्यास २४ तास लागतील. यादरम्यान १४ केटीवेअर असून हा अडथळा पार करत हे पाणी सोमवारी संध्याकाळपर्यंत जायकवाडीत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येलदरीचा पाणीसाठा दलघमीने वाढला
मराठवाड्यातल्याअकरा मोठ्या प्रकल्पांपैकी दुधना, ऊर्ध्व पैनगंगा आणि विष्णुपुरी वगळता आठ प्रकल्पांतील पाणीसाठा डेड स्टोअरेजमध्ये आहे. येलदरीमध्ये गेल्या २४ तासांत ३.४३ दलघमी पाण्याची आवक झाली असून आतापर्यंत २७ दलघमी पाण्याची आवक आली आहे, तर दुधना धरणात २.२० दलघमी पाण्याची आवक आली आहे. त्यामुळे दुधनाचा एकूण पाणीसाठा १२२ दलघमी इतका झाला असून उपयुक्त पाणीसाठा २० टक्के झाला आहे.

कमाल तापमानाचा नीचांक
दहा दिवसांपासून शहर परिसरावर ढग दाटून आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गत दोन दिवसांपासून तर पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे यंदाच्या मोसमात शनिवारी कमाल तापमानाने नीचांक पातळी गाठून ते २५.६ अंश खाली घसरले. हवेेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. वातावरणात आर्द्रता ९५ टक्के अाहे. किमान तापमान २३.३ अंशांवर पोहोचले. बाहेर गारवा आणि घरात उकाडा जाणवत आहे.

पुढे वाचा.. औरंगाबादमध्‍ये तीन दिवसात किती पाऊस पडला व पाहा शहरातील पावसाचे छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...