आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांत प्रथमच सप्टेंबरमध्ये बरसला विक्रमी 208 मिमी पाऊस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - श्रीगणेशाची (9 सप्टेंबर ) स्थापना झाल्यापासून निरोप दिल्याच्या दिवसापर्यंत (18 सप्टेंबर) दहा दिवसांच्या कालावधीत मेघगर्जनेसह 175 मिमी पाऊस झाला. गेल्या चार वर्षांत प्रथमच सप्टेंबर महिन्याच्या वीस दिवसांत 208 मिमी पाऊस कोसळला आहे. हा पहिला विक्रमी पाऊस असून संपूर्ण उत्तरा नक्षत्रात 122.8 मिमी होण्याचा विक्रमही या पावसाने स्थापित केला आहे. मागील वर्षी आणि यंदाही कोणत्याही नक्षत्रात एवढा पाऊस पडलेला नाही. वरुणाच्या या प्रसन्नतेने दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीमध्ये खळखळ पाणी वाहत आहे. हसरूलसावंगी तलावासह भूगर्भातील पाणीपातळी वाढली आहे. यामुळे शंभर टक्के रब्बी पेरणीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

कुलाबा हवामान विभागात उपलब्ध मागील दहा वर्षांच्या सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या आकडेवारीचा ‘दिव्य मराठी’ने अभ्यास केला असता यंदाच्या सप्टेंबरमधील पावसाने नोंदवलेले विक्रम ठळकपणे जाणवले. या महिन्यात गेल्या 18 दिवसांत शहरात 208 मिमी पाऊस पडला आहे. 2010 ते 2013 या गेल्या चार वर्षांत केवळ यंदाच पाऊस जाता जाता बरसला. जून ते 18 सप्टेंबरपर्यंत 631.5 मिमी अर्थात 108.5 मिमी पाऊस गतवर्षीपेक्षा जास्त पडला आहे. 2009 च्या सप्टेंबरमध्ये 212 मिमी पाऊस पडला होता. तर मागील दहा वर्षांत 2006 मध्येच विक्रमी 305 मिमी पाऊस बरसला होता. हा विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही.

दुष्काळाचे मळभ दूर झाले
यंदा वळवाच्या सरींपाठोपाठ मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने गतवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे शेतजमिनीला गेलेले तडे नाहीसे झाले आणि पेरणी वेळेवर झाली. जूनमध्ये 168.3 मिमी पाऊस झाला. त्यामुळे करपलेली पिके बहरली. जुलैमध्ये 231.2 मिमी पाऊस झाला. त्यामुळे पिकांची स्थिती आणखी मजबूत झाली. मात्र, ऐन भरवशाच्या ऑगस्ट महिन्यात हवामानात बदल झाल्याने मान्सूनने दगा दिला. ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन आणि कपाशीची वाढ जोमाने होत असतानाच पावसाने खंड दिल्यामुळे काही प्रमाणात पिकांना फटका बसला. या वर्षीही दुष्काळ पडतो की काय, अशी बिकट स्थिती निर्माण झाली होती. मात्र, 59 मिमी पाऊस पडल्याने पिकांना आधार मिळाला. 8 सप्टेंबर रोजी 33.6 मिमी आणि 9 ते 18 सप्टेंबरपर्यंत 175 मिमी असा सप्टेंबरमध्ये 208.6 मिमी पाऊस कोसळला. यामुळे दुष्काळाचे मळभ दूर झाले. खरिपातील पिके डोलू लागली आहेत, तर रब्बीच्या मशागतीला शेतकर्‍यांनी सुरुवात केली आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे. ओस पडलेल्या बाजापेठेत पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. खरेदी-विक्रीला वेग आला असून शेतकरी एकरी 15 क्विंटल कापूस होणार असल्याचे मोठय़ा अभिमानाने सांगू लागला आहे.

हस्त नक्षत्रामध्ये मुसळधार पडण्याची शक्यता
हस्त नक्षत्रास 27 सप्टेंबर रोजी सुरुवात होत असून या नक्षत्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या आवर्त वारे वाहत आहेत. त्यामुळे हस्त, चित्रा आणि स्वाती नक्षत्रात चांगला पाऊस होणार आहे. काही ठिकाणी पिकांचे नुकसान होऊ शकते. तेव्हा शेतकर्‍यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेणे योग्य ठरेल असा सल्ला हवामान अभ्यासक आर. के. मुगोणे यांनी दिला आहे.

उत्तरा : 176 चढ-उतार : 122.8 + सर्व नक्षत्रे आणि गतवर्षी पूर्ण मान्सूनच्या महिन्यात एवढा पाऊस झाला नव्हता.

पाऊस उपयुक्त
आंबा, संत्री, मोसंबी, डाळिंब या फळांबरोबरच भाजीपाला, कपाशी पिकांसाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरला आहे. फळातील रस, पोषक अन्नघटक आणि फळ पोसण्यास मदत होणार आहे. डाळिंबाचा हस्त बहार फुलणार असून पालेभाज्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डॉ. संजय पाटील, कृषिशास्त्रज्ञ, हिमायतबाग कृषी विभाग.