आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात जोरदार वृष्टी : बीड जलमय, लातूर-उस्मानाबादेत ओल्या दुष्काळाचे संकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहराला रविवारी बिंदुसरा नदीच्या पुराचा तडाखा बसला. बाजारतळ पाण्यात गेल्याने महापुरात यशवंत उद्यानाच्या भिंती, ५० टपऱ्या, सहा दुकाने, भंगार दुकाने वाहून गेली. - Divya Marathi
शहराला रविवारी बिंदुसरा नदीच्या पुराचा तडाखा बसला. बाजारतळ पाण्यात गेल्याने महापुरात यशवंत उद्यानाच्या भिंती, ५० टपऱ्या, सहा दुकाने, भंगार दुकाने वाहून गेली.
बीड, लातूर, उस्मानाबाद - मराठवाड्यात पडत असलेल्या परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात अनेक भागांत पूरस्थिती असून जिल्ह्यात शनिवारी १४ मंडळांत झालेल्या अितवृष्टीमुळे अनेक नद्या, नाल्यांना पूर आला आहे. बिंदुसरा नदीला आलेल्या महापुरात पेठ बीड भागातील वस्त्या पुराच्या तडाख्यात सापडल्या. अनेक दुकाने, टपऱ्या वाहून गेल्या आहेत. शहरातील बसस्थानक, बार्शी नाक्यावरील बसची वाहतूक रविवारी ठप्प होती. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ११९.१७ टक्के पाऊस झाला आहे. खरीप पिकाचे नुकसान झाल्याने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत पिके पाण्याखाली आहेत. तुलनेने औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी आहे.

पाटोदा तालुक्यात चार तलाव फुटले : तालुक्यात मुसळधार पावसाने दासखेड गावातील चार गावतलाव फुटले असून ३५ जनावरे गोठ्यासह वाहून गेली आहेत.
मराठवाड्यात सात, तर राज्यात एकूण १३ बळी
केज तालुक्यात सारणी आनंदगाव येथील चौथीच्या वर्गात शिकणारा विनोद बापू गायकवाड (१०) विहिरीवर पोहायला गेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. चारठाणा (ता. जिंतूर) येथून सावंगीकडे (ता. सेलू) परतणाऱ्या संतोष लक्ष्मणअप्पा चिपडे (२८) या तरुणाचा कर्परा नदीत बुडून मृत्यू झाला.

बदनापूर तालुक्यातील राळा हिवरा शिवारात रविवारी वीज पडून विष्णू तुपे (५५) व मंदाकिनी (४९) या पती-पत्नीचा मृत्यू झाला. तुळजापुरात भिंत अंगावर काेसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर पैठण तालुक्यातील गारखेडा येथे शेतात काम करताना अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर धुळे व जळगाव जिल्ह्यात सहा जणांचे बळी गेले अाहेत.

माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले
माजलगाव धरणात पाणीसाठा वाढल्याने रविवारी ११ दरवाजे एक मीटरने उघडून ४४ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीपात्रात होत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लातूर : २७ मंडळांत अतिवृष्टी
लातूर जिल्ह्यात मांजरा, रेणा, तावरजासह अन्य नद्या व नाल्यांना पूर आल्याने शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २७ मंडळांत अतिवृष्टी झाली असून बहुतांश भागांत पिके पाण्याखाली आहेत. रस्ते, पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला होता. पुरात जनावरे, शेळ्या-मेंढ्या वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

जालना : ११ गावांना इशारा
खडकपूर्णा धरणातून दुपारी पूर्णा नदीत पाणी सोडण्यात आले. नदीकाठावरील जालना, हिंगोली व बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यातील ११ गावे जालना जिल्ह्यातील आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा बीडमधील महापुराचे फोटो आणि इतर जिल्ह्यांची माहिती....
बातम्या आणखी आहेत...