आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पावसाचा जोर झाला कमी, राज्‍यात इतरत्र संततधार सुरुच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/औरंगाबाद- मोसमी पावसाने राज्‍यात सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. दुष्‍काळाने होरपळलेल्‍या जनतेसाठी हा पाऊस हवाहवासा आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे मुंबईसह कोकणातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. मुंबईसाठी धोक्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस झाला. दुपारी 2.50 वाजता मुंबईत 4.26 मीटर्सची भरती होती. त्‍यामुळे पुन्‍हा मुंबई जलमय होण्‍याची भीती होती. परंतु, पावसाचा जोर कमी झाला. त्‍यानंतर रेल्‍वे वाहतूकही हळूहळू सुरु करण्‍यात आली. पश्चिम आणि मध्‍य रेल्‍वेची उपनगरीय सेवा धीम्या गतीने सुरु आहे. मुंबई सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत सरासरी 83 मिमी पावसाची नोंद झाली.

राज्‍यात इतर ठिकाणी पावसाची संततधार सुरुच आहे. कोल्‍हापूरमध्‍ये 4 जण वाहून गेल्‍याचे वृत्त आहे. मुंबईत रस्‍ते आणि रेल्‍वे वाहतुकीला फटका बसला आहे. तर गुजरातमध्‍ये वलसाड रेल्‍वेस्‍थानकात रेल्‍वेरुळांवर गुडघाभर पाणी साचल्‍यामुळे पश्चिम रेल्‍वेची लांब पल्‍ल्‍याची वाहतूक ठप्‍प झाली आहे.

भिवंडी परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्‍यामुळे म्‍हाडा कॉलनीतील अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यात आले आहे. विरारजवळ बिरसा मुंडा कॉलनी पाण्‍याखाली गेली असून तेथील रहिवाशांना हलविण्‍यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे मध्‍य रेल्‍वेलाही फटका बसला आहे. कळवा आणि मुंब्रा येथे रुळांवर पाणी साचल्‍यामुळे धीम्या मार्गावरील वाहतुक गेल्या दोन तासांपासून ठप्प आहे. सर्व उपनगरीय गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईकडे येणाऱ्या व उपनगराकडे जाणाऱ्या गाड्या सुमारे अर्धा तास उशीराने धावत आहेत. कळव्याजवळ सकाळी वीज पुरवठ्यात बिघाड झाल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्‍प झाली होती. तो दुरस्‍त झाल्‍यानंतर पावसामुळे वाहतूक ठप्‍प पडली. मुंब्रा ते ठाणे स्थानकादरम्यान ठिकठिकाणी रुळांवर पाणी आले.

महाराष्‍ट्रासह गुजरातच्‍या पश्चिम किनारपट्टीवर मोसमी पावसाची तीव्रता वाढली आहे. गुजरातची किनारपट्टी तसेच विदर्भावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्‍यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

गेल्‍या आठवड्यात राज्‍यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली होती. त्‍यानंतर तीन दिवसांची विश्रांती घेल्‍यानतर बुधवारपासून पावसाला सुरुवात झाली. तेव्‍हापासून कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. आज (शुक्रवारी) पावसाचा जोर वाढला. कोकणात मालवण, कणकवली, मंडणगड आणि रायगड येथे मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले. त्‍यामुळे रस्‍ते वाहतूक मंद गतीने सुरु आहे. रेल्‍वे वाहतूकही मंद गतीने सुरु आहे.

दरम्‍यान, मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावांपैकी एक तुळशी तलाव आज (शुक्रवार) पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. गेल्‍या वर्षीपेक्षा जवळपास महिनाभर आधीच तलाव पूर्णपणे भरला. याशिवाय मोडक सागर तलावही लवकरच भरणार आहे. इतर तलावांमध्‍येही भरपूर पाणीसाठा वाढला आहे.

कोल्हापुरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. शिंगणापूर नाक्याजवळ पंचगंगा नदीच्या प्रवाहात एक जीप वाहून गेली आहे. यातील चार जणांचा शोध सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिस या चार जणांचा शोध घेत आहेत. मात्र, संततधार पावसामुळे अडथळे येत आहेत. सांगलीमध्येही रात्रीपासून पाऊस सुरुच आहे.

विदर्भात नागपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्‍ह्यांमध्‍ये गुरुवारपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही थांबलेला नाही. चंद्रपूरमध्ये प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

राज्‍या मुसळधार पावसाचा इशारा.... दोन दिवस राहणार पावसाचा जोर.. वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..