आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हेल्मेट'मुळे वाचेल रोज एकाचा जीव! दोन दिवसांत हेल्मेट सक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात रस्ता अपघातामुळे रोज एका दुचाकीस्वाराचा बळी जात असल्याचा निष्कर्ष आहे. डोक्याला मार लागल्यामुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो, हे सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर केल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो हे सत्य आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यात हेल्मेट सक्ती करणार असल्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पावले उचलली असून दोन दिवसांत या मोहिमेला सुरुवात होईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी दिली.
रस्त्यात होणाऱ्या १३.८ टक्के अपघातांत डोक्याला जबर मार लागल्याचे समोर आले आहे. यात अपघातात जखमी होणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या ८५ टक्के आहे. अपघात झाल्यानंतर अनेकदा योग्य आणि तातडीने उपचार मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन रोगाच्या आधी उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. या मोहिमेची सुरुवात महाविद्यालयांपासून केली जाणार आहे. समुपदेशनासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहेत. हे पथक महाविद्यालयांतील मुलांना हेल्मेटचे महत्त्व सांगणार आहे. ही मोहीम केवळ सक्ती नसावी, वाहनधारकांनी पुढाकार घेऊन आपल्या स्वत:च्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरावे हा यामागचा प्रमुख हेतू आहे, असे आयुक्त म्हणाले.
एमआयटीनेघेतला पुढाकार : एमआयटीअभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारे तीन हजार विद्यार्थी दुचाकीवर येतात. त्यांनी महिन्यांपासून हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट घातले अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये आपली दुचाकी लावता येते. महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना हे सक्तीचे करण्यात आले, अशी माहिती एमआयटीचे जनसंपर्क अधिकारी प्रा. भागवत क्षीरसागर यांनी दिली.

२००९ मध्ये राबवली मोहीम
शहरात२००९ मध्ये हेल्मेट मोहीम राबवण्यात आली होती. त्या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. तत्कालीन पोलिस आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी सक्तीने ही मोहीम राबवणे सुरूच ठेवले होते. प्रत्येक चौकात वाहनांची पाहणी करण्यासाठी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर मोहीम गुंडाळण्यात आली होती. त्या चुका टाळण्याकरिता अमितेशकुमार यांनी त्या वेळी वर्तमानपत्रांत छापून आलेल्या बातम्यांची कात्रणेदेखील मागवून घेतली आणि प्रथम समुपदेशन हा मार्ग निवडला आहे.

तरुणांचा अपघातात बळी जाणे म्हणजे देशाचे नुकसान आहे. अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे तरुणांचे बळी गेल्याचे समोर आले आहे. त्यांनी जर हेल्मेट घातले असते तर मृत्यू टळू शकला असता. म्हणून सक्तीपेक्षा समुपदेशनावर भर दिला जाणार आहे. - अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

दर आठवड्याला होणाऱ्या अपघातांपैकी किमान १३.८ टक्के अपघातांत डोक्याला मार असतो. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर खूप प्रयत्नदेखील करतात. मात्र, डोक्याला लागलेल्या जखमेमुळे डॉक्टरांना यश येत नाही. डॉ. आनंद डंक, मेंदूशल्यचिकित्सक, धूत हॉस्पिटल