आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीचे लायसन्स घेतानाच हेल्मेट वापराचे प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची सक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुचाकीचे लायसन्स घेतानाच हेल्मेट वापराचे प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची सक्ती केली जाणार आहे. यासाठी परिवहन मंत्रालयाने पावले उचलली आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही या निर्णयाचे संकेत दिले आहेत. मात्र, ही सक्ती म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीच असल्याचे त्यांनी सांगितले.

दुचाकीवरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. राज्यातील काही शहरांमध्येच त्याची अंमलबजावणी होते. इतर ठिकाणी दुचाकीचालक आक्रमक होत असल्याने वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन परिवहन मंत्रालयाने नवा उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार दुचाकीचे लायसन्स काढतानाच ‘मी हेल्मेट घालूनच दुचाकी चालवणार’ असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. या प्रतिज्ञापत्राची प्रत वाहतूक पोलिसांकडे दिली जाईल. पुढे हा दुचाकीचालक विनाहेल्मेट आढळल्यास त्याला प्रतिज्ञापत्राची आठवण करून देत दंड केला जाणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाणे म्हणाले की, अशा हालचाली सुरू असल्या तरी अजून लेखी आदेश आलेले नाहीत.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती
जिल्ह्यात सध्या ७ लाख ६५ हजार ५७० दुचाकी आहेत. त्यातील जेमतेम एक हजार जण नियमितपणे हेल्मेट वापरतात, असे वाहतूक पोलिस विभाग, परिवहन कार्यालयाचे निरीक्षण आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन
-सरकार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार आहे. हेल्मेटसाठी प्रतिज्ञापत्र म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचे पालन असा अर्थ आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई होईल.
दिवाकर रावते, परिवहनमंत्री